बाल्कनीतले प्रेम | मराठी कथा | Marathi Story

बाल्कनीतले प्रेम | मराठी कथा | Marathi Story

Free Woman Nature photo and picture
Marathi Story

माझे नाव अक्षय आहे. मी मोठ्या शहरात काम करतो आणि मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहतो. घरची परिस्थिती चांगली नसल्याने घराची जबाबदारी कायम माझ्यावरच राहिली. म्हणूनच माझ्या आयुष्यात प्रेम आणि मुली कधीच आल्या नाहीत.

पण गेल्या महिनाभरापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळत आहे. मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो, त्या सोसायटीच्या रस्त्याच्या पलीकडे एक सुंदर मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून बसून रोज संध्याकाळी मला पाहत राहते.

सुरुवातीला मला वाटले की हा माझा गैरसमज आहे, पण जेव्हा ते रोज रोज होऊ लागले तेव्हा मला विश्वास आला की कदाचित माझ्यासारखीच ती देखील प्रेमाच्या शोधात आहे. मी माझ्या ऑफिसमधून संध्याकाळी ६ वाजता येतो आणि फ्रेश होऊन माझा संध्याकाळचा चहा मी बाल्कनीमध्ये बसून बाहेर पाहात पहात पितो.

मी बाल्कनीमध्ये आल्यानंतर साधारण ५-१० मिनिटात तीदेखील तिच्या बाल्कनीत येते आणि तिच्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून एकटक मला पाहात बसते. पहिल्यांदा हे सगळे मला फार विचित्र वाटले, पण नंतर हळूहळू मला ते आवडू लागले. जवळपास तासभर आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत राहतो.

मग तिच्या घरातून कुणीतरी येऊन तिला आत घेऊन जाते. गेल्या महिन्याभरापासून हेच चालू आहे. मी तिच्याशी बोलण्याचापण प्रयत्न केला, पण तिच्या आणि माझ्या सोसायटी मधले अंतर फार असल्यामुळे तिला काही ऐकू गेले नाही.

हळूहळू न सांगताही हा सगळं प्रकार माझ्या मित्राला कळला. तो म्हणाला, “मित्रा, किती दिवस तुम्ही दोघे एकमेकांकडे असेच बाल्कनीतून बघत राहणार? सरळ सरळ जाऊन बोलत का नाही तिच्याशी? तिच्यापण मनात काय आहे ते तुला नक्की कळेल.” आता मलाही तिच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत त्या जाणून घ्यायच्या होत्या.

ही Marathi Story आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

पण तिच्याशी संपर्क कसा साधायचा ते काळात नव्हते. मी मित्राला माझा प्रॉब्लेम सांगितला. तो म्हणाला,”हात्तिच्या! एव्हढंच ना? मी सांगतो तुला आयडीया. मी एका सेल्स कंपनीत काम करतो. माझी कंपनी पाणी शुद्ध करायचे प्युरिफायर बनवते. त्या प्युरिफायरच्या सेल्सच्या निमित्ताने जाऊ तिच्या सोसाटीमध्ये. मला ही कल्पना आवडली.

मग तर आम्ही ऑफिशियली तिच्या सोसाटीत जाऊ शकत होतो. माझे मन अजूनही अस्वस्थ होते. तिला माझ्यात नक्की इंटरेस्ट आहे का? अस प्रश्न माझ्या मनात येत होता. पण आता भेटणे गरजेचे झाले होते.

मला तिला भेटून तिच्याशी बोलायलाच हवे. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी ऑफिस मधून आल्यावर आम्ही दोघेही तिच्या सोसाटीत गेलो. सोसायटीच्या वॉचमनला चिरीमिरी देऊन आणि सेल्समन आहोत असे सांगून तिच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळवला.

बिल्डिंगमध्ये गेल्यावर इथेतिथे कुठेही न जाता थेट तिच्या फ्लॅटसमोर गेलो. माझ्या पोटात अनेक फुलपाखरे उडतायत कि काय असा भास झाला. मी थरथरत्या हाताने बेल दाबली. माझा मित्र मला डोळ्यानेच शांत राहा म्हणून खुणावत होता. मला वाटत होते कि दार तिनेच उघडले तर किती बरे होईल.

पण दार एका माणसाने उघडले आणि माझा अपेक्षाभंग झाला. “येस?” त्या माणसाने माझ्याकडे पाहात विचारले. “काका, मी…. म्हणजे आम्ही…. मी चाचरत बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडून शब्दच फुटेना.” “काका, आम्ही वॉटर प्युरिफायर कंपनी मधून आलो आहोत. आमच्या कंपनीने नवीन प्युरिफायर लाँच केला आहे. ५०% डिस्काउंट आणि डेमो फ्री.”

माझ्या सेल्स मध्ये सराईत मित्राने सफाईदारपणे बोलून वेळ मारून नेली. काका म्हणाले “नाही, आम्हाला नको आहे.” मी निराश झालो. परत जायला वळलो. पण माझा मित्र पक्का सेल्समन. मला थांबवत तो म्हणाला,”अहो काका, काही हरकत नाही. नका घेऊ प्रॉडक्ट. पण कमीत कमी डेमो तरी पहा. एकदम फ्री आहे.” काकांनी क्षणभर विचार केला आणि बोलले,”ठीक आहे. आत या.” मला माझ्या मित्राच्या चिकाटीचे कौतुक वाटले.

मी त्याच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकला. आम्ही आत गेलो. घरी गेल्यावर ती दिसेल असे वाटले पण तसे झाले नाही, बेडरूमचे दरवाजे बंद होते. आम्ही काकांना डेमो देऊ लागलो. काका तसे चांगले होते. खूप पेशंटली आमचा डेमो बघत होते. माझे सारे लक्ष मात्र बेडरूमच्या दारावर होते. थोड्या वेळाने बेडरूमचा दरवाजा उघडला.

तिला समोर पाहून माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडू लागले. ती लांबून जेव्हढी सुंदर दिसायची त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर ती प्रत्यक्षात होती. माझी नजर फक्त तिच्यावरच खिळली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होते. मला वाटले की तिने मला ओळखले आहे. ती आता बाल्कनीत जाऊ लागली.

काकांनी लगबगीने पुढे जाऊन तिचा हात धरला आणि तिला बाल्कनीत नेऊ लागले. ती म्हणाली, “काका, मी तुम्हाला रोज रोज सांगते, पण तुम्ही ऐकतच नाही. मी स्वतः बाल्कनीत जाऊ शकते.” बाल्कनीत जाण्याची वाट लहान होती, पण ती हळूहळू चाचपडत चालत बाल्कनीकडे चालत होती.

मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे वेड्यासारखा बघतच राहिलो. काकांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “ती माझी पुतणी आहे, तिला दिसत नाही. गेल्या महिन्यापासून आमच्याकडे राहायला अली आहे.

दररोज संध्याकाळी तिला बाल्कनीत उभे राहणे, बाहेरच्या मोकळ्या हवेत श्वास घेणे आणि ट्रॅफिकचा, लोकांचा आवाज ऐकणे आवडते. फार हट्टी आणि मानी आहे ती! मला तिचा हातही धरू देत नाही. ती म्हणते तू काय माझ्यासारखा आंधळा आहेस काय जो माझा हात धरतोयस?”  मी सुन्नपणे तिच्याकडे पाहताच बसलो.

ती तशीच रोजच्यासारखी बाल्कनीत बसली होती. ती त्याच दिशेने बघत होती, जिथे माझा फ्लॅट होता आणि तशीच हसत होती जशी रोज हसते. आम्ही तिथून खिन्न मनाने परत आलो. आम्हा दोघांना खूप वाईट वाटत होतं.

मी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो जिने मला कधी पहिलेच नाही आणि कधी पाहण्याची शक्यताच नाही. मी अजूनही रोज त्यावेळेला तसाच बाल्कनीत बसतो आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहात राहातो. बस्स! मला फक्त एवढंच हवं आहे आणि त्यापलीकडे मी जास्त काही विचार करू शकत नाही.

समाप्त

Leave a Reply