तीन महिन्यांचा संसार | Marathi prem Katha

तीन महिन्यांचा संसार | Marathi prem Katha

Free People Man photo and picture
Marathi Prem Katha

मायरा दिसायला अतिशय सुंदर होती. सुरुवातीला मला वाटले की ती माझ्यासोबत लग्नाला हो म्हणणार नाही. पण तिला भेटायला गेलो आणि मला समजले कि ही इतर सुंदर मुलींप्रमाणे घमेंडी नाहीये. खूपच नम्र होती ती.

तिचे  कुटुंबिय देखील स्वभावाने खूप चांगले होते. तिने लग्नाला हो म्हटले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. थोड्याच दिवसात आमचे लग्न झाले. लग्नानंतर मायरा माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्यच  बदलले आहे. मी खूप नशीबवान आहे असे सगळे मला म्हणतात.

माझ्या लग्नाला जेमतेम 3 महिने झाले आहेत. माझे स्वप्न होते की एका मोठ्या शहरात कपड्यांचे माझे मोठे शोरूम असावे. मी मायराला याबद्दल सांगितले. तिलादेखील आनंद झाला. ती म्हणाली, “आजपासून हे फक्त तुझेच नाही, तर माझे देखील स्वप्न आहे. आपण दोघे मिळून हे स्वप्न पुरे करूयात.” मी मनोमन खूप खुश झालो.

इतके प्रेम करणारी आणि समजूतदार बायको मिळायला खरंच नशीब लागते. माझ्यासाठी हे स्वप्न किती मोठे आहे हे मायराला माहीत होते आणि आता मी त्यात रात्रंदिवस गुंतलो होतो. मोठ्या कष्टाने मला पाहिजे असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात मला जागा मिळाली, पण पैसे खूप होते. त्यामुळेच मी माझ्या गावातील जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता.

माझ्या इतर भावांचाही जमिनीत हिस्सा होता म्हणून मला गावी जाऊन यांचीदेखील परवानगी काढायची होती. ह्यासाठी ४-५ दिवस मी गावी जायचा बेत आखला आणि मायराला तसे सांगितले. ती म्हणाली,”हरकत नाही, ये तू जाऊन गावी. मी देखील ४ दिवस माहेरी आईबाबांकडे जाऊन येते.”

मलाही वाटलं ते ठीकच आहे. नाहीतरी माझ्याविना एकटी घरात बसून काय करेल बिचारी? मी पटकन होकार दिला. दुसऱ्या दिवशी मायरा तिच्या माहेरी गेली. मी माझ्या गावी गेलो. मायराशी फोनवर रेगुलर बोलायचो. गावी जमिनीची कागदपत्रे आणि इतर सर्व गोष्टींना माझ्या अंदाजापेक्षा थोडा जास्ती वेळ लागणार होता.

याबद्दल मी मायराला सांगितले. ती म्हणाली,”ठीक आहे, काही हरकत नाही. पण काम पूर्ण करूनच ये.” असेच दोन-तीन दिवस गेले.  एका संध्याकाळी मी तिला फोन केला तेव्हा ती थोडी गोंधळली होती आणि जास्त काही बोलत नव्हती. मी विचारले, “काय झाले मायू? तू ठीक आहेस ना?” यावर ती बोलली,”जानू, मला तुला काहीतरी सांगायचे आहे.”

“अगं मग सांग ना. काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का?” मी अधीरतेने विचारले. ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, “नाही, आता नाही, भेटल्यावरच सांगेन.” मी पण ‘ठीक आहे’ म्हणालो. पण त्यानंतर माझ्या आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ होणार आहे हे त्यावेळी मला माहीत नव्हते.

ही Marathi prem Katha आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

दुस-या दिवशी दुपारी मी मायराला फोन केला असता तिने फोन उचलला नाही. मलाही वाटले की काहीतरी काम असेल, नंतर कॉलबॅक करेल. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दिवसभर मी माझ्या कामात मग्न राहिलो. कामही महत्त्वाचे होते कारण ते पूर्ण करूनच मी पटकन मायराकडे परत जाऊ शकलो असतो.

दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी पुन्हा मायराला फोन केला. मात्र यावेळी तिचा फोन बंद होता. तेव्हा मला वाटले की कदाचित ती काही कामासाठी गेली असावी आणि मोबाईल डिस्चार्ज होऊन बंद पडला असावा.

मी रात्री परत तिला फोन केला, पण तरीदेखील मोबाइल बंद. आता मला थोडी काळजी वाटू लागली होती पण मग मला वाटले की ती तिच्याच तर घरी आहे, आणि काही झाले असते तर मला नक्कीच फोन आला असता. काय झाले असावे? तिच्या घरी कोणाला तरी फोन करायचा विचार केला पण रात्रीच्या वेळी फोन करणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी झोपी गेलो.

सकाळी उठल्याबरोबर मायराशी बोलायला हवं असा विचार करत होतो. सकाळी फोन केला पण तरीही परत तेच, तिचा फोन बंद होता. आता मी तिच्या आईला फोन केला. पण तिनेही माझा कॉल उचलला नाही. आता मला थोडी काळजी वाटायला लागली की काय झाले असावे? पुढचे दोन दिवस मला ना मायराचा फोन आला ना तिच्या आईचा.

तिच्या आईचा फोन पण आता बंद लागत होता. मी पण माझ्या कामात व्यस्त राहिलो. एके दिवशी संध्याकाळी मला मायराच्या आईचा म्हणजे माझ्या सासूचा फोन आला. मी विचारले, आई, तुम्ही सगळे कुठे आहात? मायराचा, तुमचा फोन बंद का होता?” तेव्हा त्यांनी सांगितले की मायरा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती.

तिथे नेटवर्क नसल्यामुळे ती कॉल करू शकत नाही. आणि तिचा स्वतःचा फोन पाण्यात पडल्यामुळे तो बिघडला होता. तो दुरुस्तीला दिला होता. आता माझी काळजी जरा कमी झाली. आणि मी माझ्या कामाला लागलो.

मायरा अजून पाच दिवस तिथे राहणार होती. मी म्हटले ठीक आहे. इथे गावातील माझे कामही जवळपास संपले होते. तीन – चार दिवसात माझ्या हातात पैसे येणार होते. माझ्या हातात पैसे येताच मी तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर थेट मायराच्या माहेरी गेलो. मला पाहून माझी सासू आनंदी होण्याऐवजी घाबरली होती.

पण कसलीही रिअक्शन न देता मी थोडावेळ तसाच बसलो. मायरा  कुठे आहे असे सासूला विचारले. ती म्हणाली की ती अजून आली नाही. मी म्हणालो, “आई, पाच दिवस उलटून गेले आहेत. अद्याप ती घरी का नाही आली?” यावर सासू घाईघाईत बोलली, “येईल उद्या किंवा परवा. ती आली की मी थेट तुमच्याच  घरी तिला पाठवेन.”

आता माझा नाईलाज झाला. मी तेथून उठलो आणि रागाने काहीही न बोलता निघून गेलो. ‘इतकी कशी बेपर्वा होऊ शकते मायरा? काही फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही. तिच्या फोनला नेटवर्क नाही तर दुसऱ्या कुणाच्या तरी फोनवरून फोन करू शकते. आणि तिची आई पण इतक्या तुटकपणे का वागत होती माझ्याशी? येऊ दे मायराला. चांगलाच जाब विचारतो आता तिला!’ असे विचार मनात येत असतानाच रात्री कधीतरी मला झोप लागली.

अजून पुढचे दोन दिवस उलटून गेले. मायराचा अद्याप पत्ता नव्हता. मला तिच्याविना अजिबातच करमत नव्हते. आता माझी सटकली. मी तिरमिरीतच परत मायराच्या माहेरी गेलो.

सासू मला पाहून घाबरली. म्हणाली, “अद्याप मायरा आली नाहीये.” “आली नाहीये म्हणजे? नक्की कुठे गेलीये ती? मला तिचा पत्ता द्या. मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन घेऊन येतो.” आता माझा पारा आणि आवाज दोन्हीही चढले होते.

“जावईबापू, चिडता कशाला? येईल मायरा एकदोन दिवसात परत.” तिची आई अजीजीने बोलली. माझ्या  मनात अनेक विचार येऊ लागले की मायरा आणि तिची आई माझ्याशी असे का वागतायात? नक्की काय झाले असावे? नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. “अहो. दहा दिवस उलटून गेले, मायराचा पत्ता, कॉन्टॅक्ट काही नाही आणि तुम्ही इतक्या कॅज्युअली मला सांगतायत की ती येईल परत? तुम्ही तिचा पत्ता देतायत की मी पोलिसात जाऊ?” मी रागाने म्हणालो.

आता मायराच्या आईची घाबरगुंडी उडाली. ती घाबरून पण हळू आवाजात म्हणाली,”  बेटा, आता मी जे सांगणार आहे त्यावर तूमचा विश्वास बसणार नाही. मायरा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. तिचे लग्नाआधी एके मुलावर प्रेम होते. आणि आता त्याच मुलासोबत ती मैत्रिणीच्या लग्नाच्या बहाण्याने संधी मिळताच पळून गेली आहे.”

हे ऐकून माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. मी म्हणालो,”नाही! असे होणारच नाही. खोटं बोलतायत तुम्ही.” माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. एक क्षण मला हे एक भयानक स्वप्नच पडते आहे असे वाटू लागले.

सासू म्हणाली,”बेटा, हेच सत्य आहे. मला माहित आहे की तुमचे तिच्यावर खूप प्रेम आहे. पण आता हेच सत्य आहे की ती पळून गेली आहे, तुम्हाला आता तिला विसरावे लागेल. आम्ही पोलिसात गेलो नाही, कृपा करून तुम्हीपण जाऊ नका अन्यथा आमची खूप बदनामी होईल. म्हणूनच आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो.” असे कसे होऊ शकते? मायरा माझ्या सोबत 3 महिने राहिली होती. आणि मला वाटत होते की तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तिला ओळखायला माझ्याकडून इतकी गल्लत कशी काय झाली? माझे मन अजूनही मान्य करायला तयार नव्हते. पटतच नव्हते की मायराने मला फसवले होते.

माझी सासू माझ्यासमोर रडत होती, क्षमा मागत होती. एवढी मोठी गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना. मायरा स्वभावाने इतकी लबाड असेल असे कुणालाच वाटले नाही. मायराच्या दुःखी आईकडे बघून मी आणि माझे कुटुंबीय गप्प बसलो आणि कोणतेही मोठे पाऊल पुढे उचलले नाही. हा विश्वासघात मात्र मला सहन होत नव्हता.

मायरावर माझे खूप प्रेम होते आणि ती मला काहीही न बोलता गुपचूप माझ्या आयुष्यातून निघून गेली होती. मला आता मायरा नावाचा तिरस्कार वाटत होता.

या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर, माझ्या कामावर खूप प्रभाव पडला होता. जे शोरूम माझे स्वप्न होते, ते सुरू करण्यासाठी माझ्याकडे पैसे तर होते पण तरीही आता मला काहीही करावेसे वाटत नव्हते. एखाद्याची इतकी फसवणूक झाली असेल तर तो आनंदी तरी कसा राहणार? माझे कुटुंबीय माझी खूप काळजी घेत होते.

पण माझे मन कशातच रमत नव्हते. मी मायराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मला तिला शोधून विचारायचे होते की तिने  माझ्यासोबत असे का केले. आता मायराला माझ्या आयुष्यातून निघून जाऊन ७ महिने झाले होते. मी पण तिला  विसरून जाऊन पुन्हा माझ्या आयुष्यात व्यस्त होण्याचा प्रयत्न करीत होतो.

एके दिवशी काही कामानिमित्त मी मायराच्या माहेरच्या एरिआत गेलो होतो. तेथून परतत असताना मायराचे घर लागले. आपसूकच माझी नजर त्यांच्या घराकडे गेली. मी पाहिले तर खिडकीत मायरा होती. आता मला राहावले नाही. मी पटकन त्यांच्या दारावरची बेल वाजवली. मला मायराला भेटून माझ्या फसवणुकीबद्दल जाब विचारायचाच होता.

अपेक्षेप्रमाणे मायराच्या आईने दार उघडले. तिच्याशी काहीही न बोलता तिला बाजूला करून मी थेट मायराच्या रूमकडे गेलो. तिच्या आईने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो.

रूममध्ये जाताच जे दृश्य पाहिलं ते बघून मी जागच्या जागीच थबकलो. आता आश्चर्यचकित व्हायची पाळी माझी होती. मायरा व्हील चेअरवर बसली होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी विचारले, “मायरा, काय झाले तुला? तू आणि व्हील चेअरवर? काय झालेय नक्की?” मायरा फक्त रडत होती.

तिची आई म्हणाली, “बेटा, मायरा मैत्रिणीच्या लग्नाला गेली असताना तिचा अपघात झाला आणि ती जबर जखमी झाली, पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्यामुळे तिचे दोन्ही पाय लुळे पडले आणि तिला आता चालता येत नाही. आणि उपचारासाठी खूप पैसे लागतील.

तुम्हाला कळवण्यापासून मायरानेच आम्हाला रोखले होते. म्हणाली, “अजून अख्खे आयुष्य पडले आहे ह्यांच्यासमोर. नवीन शोरूम उघडण्याचे ह्यांचे स्वप्न आहे. जर मी त्यांच्या आयुष्यात राहिले तर मी त्यांच्यावर ओझे होईल.

ह्या लंगड्या बायकोमुळे त्यांनी का आयुष्याची माती करावी? मायरानेच आम्हाला सांगितले की मी पळून गेल्याची अफवा पसरावा म्हणजे तुम्ही मला विसरून जाल.” माझ्या मेंदूला आता झिणझिण्या आल्या होत्या. मायराने तिच्या अपघातामुळे किती भोगले होते आणि मी तिच्याबद्दल काय काय विचार करत होतो.

तिचे माझ्यावर इतके प्रेम होते आणि मी? मी काय करू? भरलेल्या कंठाने मी तिला एव्हढेच बोलू शकलो,”अगं राणी! माझ्यासोबत असा अपघात होऊन जर मी लंगडा झालो असतो तर तू सोडून दिलं असतंस का मला?”

मायरा रडत रडत म्हणाली, “नाही नाही, प्लीज असं बोलू नकोस. मी तुझी  अपराधी आहे. माझ्या पोटात असलेले आपले मूलही या अपघातातून वाचले नाही. तू मला विसरून जाऊन दुसरीशी लग्न कर. मला तुझ्यावर ओझे बनायचे नाही आहे. मायराच्या डोळ्यांतून अश्रू काही थांबत नव्हते; तिने अश्रूंना जणू इतके दिवस रोखून ठेवले असावे.

गेल्या काही महिन्यांत मी मायरा बद्दल कितीकिती वाईट विचार केला होता ते देवच जाणे, पण आता माझ्या मायराला क्षणभरही माझ्यापासून दूर ठेवायचे नव्हते. मायराचे काहीही न ऐकता तिला मी माझ्यासोबत घरी घेऊन आलो.

आता तिला पुन्हा चालता यावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी माझे शोरूम विकून मायराला बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखवले. आशेचा किरण दिसतोय. तिने पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहावे. बस्स!! हे एकच इच्छा आता मला आहे.

समाप्त

Leave a Reply