(भाग १ वरून पुढे चालू)
ही परिस्थिती काही एकट्या राहुलची नव्हती. प्रेमाअभावी अनघालाही त्रास होऊ लागला होता. तिचे जीवन म्हणजे फक्त यांत्रिक झाले होते. सकाळी उठून ब्रेकफास्ट तयार करणे, दुपारचे जेवण तयार करून बाजूला ठेवणे, आणि कॉलेजवरून घरी आल्यावर रात्रीचे जेवण बनवणे हा तिचा एकच यांत्रिक नित्यक्रम बनला होता.
संवादाअभावी अनघाचे मन प्रेमासाठी रात्रंदिवस तळमळत होते. तुम्ही कितीही कृत्रिम असलात तरी नैसर्गिक गरजा मारणे फार कठीण असते. अनघालाही तिच्या जवळ कोणीतरी तिला प्रेम करणार असावं अशी तीव्र इच्छा वाटत होती, ज्यांच्यासोबत ती आपल्या भावना शेअर करू शकेल आणि जो तिच्या आयुष्यातील पोकळी भरून काढू शकेल.
तिचे मन आता एक साथीदार शोधू लागले होते आणि तिच्या समोर पीएचडीचा विद्यार्थी, तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असलेला जीत आला. ती स्वतःला जीतच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकली नाही. शनिवार सुट्टीचा दिवस होता. घरातील घुसमटणाऱ्या वातावरणातून मुक्त होण्यासाठी अनघा जीतला भेटण्यासाठी आणि पीएचडीची चर्चा करण्याच्या बहाण्याने टेकडीवर आली होती.
टेकडीमागचा सनसेट पॉईंट तरुण प्रेमी आणि नवविवाहित जोडप्यांसाठी योग्य असा होता. हा सनसेट पॉईंट अनघाचा फेव्हरेट होता. ती आणि राहुल अनेकदा एकांत शोधण्यासाठी ह्याच सनसेट पॉइंटला येऊन बससयचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडाखाली असलेल्या बाकावर बसून तिने दूरवर नजर टाकली आणि राहुलसोबत घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी जिवंत झाल्या.
राहुल आणि अनघा एकच कॉलेजमध्ये शिकत होते. अनघा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तर राहुल पीएचडीला होता. कॉलेजचे अनेक लेक्चर्स बंक करून दोघेही तासंतास इथे येऊन एकमेकांच्या बाहुपाशात त्यांच्या भविष्याची स्वप्ने पाहात बसायचे.
“राहुल, हे माझे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शेवटचे वर्ष आहे. त्यानंतर काय? आपण वेगळे होऊ.” अनघा भरल्या डोळ्यांनी राहुलच्या छातीवर आपले डोके टेकवून म्हणाली.
“असू दे! कॉलेजचे शेवटचं वर्ष असेल, पण आपल्याला तर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहायचं आहे” राहुलने अनघाला घट्ट मिठी मारत म्हटले. “काळजी करू नकोस अनु … हे बघ, तू पुढच्या वर्षी पीएचडीला ऍडमिशन घे. म्हणजे आपण परत सोबत येऊ.” राहुलने अनघाला सुचवले.
“वा! मस्त आयडिया! राहुल माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्यापासून कधी वेगळा होऊ नकोस. प्लीज दुसऱ्या कुणालाही आयुष्यात स्थान देऊ नकोस,’ अनघाचे अश्रू थांबत नव्हते. “माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस अनु,” असे म्हणत राहुलने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. जणू राहुलच्या पीएचडीच्या सूचनेने अनघाला नवसंजीवनी दिली आहे.
बराच वेळ दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात बसून राहिले. दोघांचीही पीएचडी झाल्यानंतर दोघांनाही त्याच कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरीही लागली. त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. दोघांच्याही कुटुंबियांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. त्यांच्याकडून दोघांना कसलाही विरोध झाला नाही. थोड्या दिवसांनी दोघेही लग्नाच्या अतूट बंधनात बांधले गेले.
अनघाच्या सासरच्या घरात हे दोघे, सासू सासरे आणि धाकटा भाऊ असे कुटुंब होते. अडचण एवढीच होती की घर अगदी लहान होते. त्यात राहुलचे आई-बाबा थोडे जुन्या विचारांचे होते. अनघा आणि राहुलचे बाहेर जेवणे, रात्री अपरात्री बाहेर भटकणे त्यांना पसंत नसायचे.
ही हृदयस्पर्शी कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
अनघा आणि राहुल सकाळी एकत्र कॉलेजला निघायचे आणि संध्याकाळी परतायचे. त्यानंतर थकलेल्या अनघाला घरची कामे करावी लागली. घरातील सदस्य मोलकरीण ठेवण्यास राजी नव्हते. आपल्या कुटुंबात कधी मोलकरीण आपण ठेवलीच नाही, घरातील कामे आपण बायकांनी नाही करायची तरी कुणी करायची असा तिच्या सासूचा युक्तिवाद असायचा.
नवीन घरात मात्र अनघाची मात्र फार घुसमट होत होती. तिला प्रत्येक गोष्ट सासू सासर्यांना विचारून करावी लागायची. ती एक स्वतंत्र विचाराची मुलगी होती आणि घरातील कामाची तिला सवय नव्हती. त्यापेक्षा वेगळे राहिलेले बरे असे तिला आता वाटू लागले होते. यासाठी त्याला राहुलची साथ हवी होती, पण खूप प्रयत्न करूनही शेवटी आज आपल्यासोबत आज राहुल नाही याची खंत तिला सतावत होती.
हे ही वाचा: तुजविण सख्या रे – भाग १
“फार वेळ वाट तर पाहावी लागली नाही ना?” जीतच्या प्रश्नाने अनघाची तंद्री भंग पावली. “नाही नाही. हे काय मी पण आताच आले.” राहुलच्या आठवणीतून बाहेर येत अनघा घाईघाईने म्हणाली. नंतर जीत आणि अनघाने प्रोजेक्ट डिसकस केला आणि त्यानंतर ते घरी गेले. खरंतर आपल्याबद्दल जीतच्या मनात काही स्पेशल फीलिंग्स आहेत का ते पाहण्यासाठी अनघाने त्याला तिथे बोलावले होते.
पण तिला जाणवले कि त्याच्या मनात अनाघाबद्दल तशा फीलिंग्स नाहीयेत. जीत स्वत: त्याच्या एका वर्गमित्राच्या प्रेमात बुडाला होता. अनघा आता हिरमुसली. या रोमँटिक अशा संध्याकाळी ना तिचा नवरा तिच्यासोबत होता ना तिच्या एकतर्फी प्रेमातला प्रियकर. ती आता आयुष्यात एकटी पडली होती. अगदी एकटी, एकाकी!!!
भावनाशून्य आणि संवादही आयुष्य जगत असताना राहुल आणि अनघा एकमेकांसाठी अनोळखी झाले होते, जे एका घरात राहात तर होते पण एकमेकांसाठी त्याचे काही अस्तित्वच नव्हते. एक दिवस ब्रेकफास्ट झाल्यानंतर दोघेही आपापल्या मोबाईलला चिकटून होते, त्याचवेळी त्यांचे दोघांचेही कॉमन फ्रेंड्स अमन आणि नीता त्यांना भेटायला आले.
दोघेही महापालिकेत सेवेत होते. अनघा आणि राहुलप्रमाणेच त्या दोघांनीही प्रेमविवाह केला होता आणि ते खूप आनंदी होते. चौघेही लॉनमध्ये बसून छान गप्पा मारू लागले आणि दुपारी जेवून अमन आणि नीता परत आपल्या घरी गेले. पण संवादादरम्यान दोघांनाही अनघा आणि राहुलमध्ये काहीतरी बिनसल्याचे लक्षात आले.
बाहेरून लोकांकडूनही त्यांनी ह्या दोघांबद्दल बऱ्याच अफवा ऐकल्या होत्या. पण त्या खऱ्या असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. घरी पोहोचल्यानंतर दोघांनीही अनघा आणि राहुलचे नाते वाचवण्यासाठी काय करता येईल ह्याबद्दल एकमेकांशी चर्चा केली. त्यांनी दोघांच्या मनात नक्की काय चालले आहे ते पाहण्यासाठी दोघांशीही वेगवेगळे बोलायचे ठरवले.
त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी राहुलला चहासाठी बोलावले. चहा पिताना अमन बोलू लागला, “राहुल, काय झालंय तुम्हा दोघांना, तुम्ही दोघेही असे जीवन का जगतायत? कसल्या नरकयातना भोगतायत? आमच्यापासून काहीही लपलेले नाही.”
“अनघाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, आता एकत्र राहणे कठीण आहे.” राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि मग ओक्सबोक्शी रडू लागला.
“अरे राहुल, होते असे आयुष्यात कधी कधी. अजून काही संपलेले नाही. तुम्ही दोघे अद्याप एकत्र राहत आहात, बरोबर ना,” नीताने स्पष्ट केले.
“कसले घर आणि कसले एकत्र राहणे? अनघाने घराचा नरक बनवला आहे.” राहुल चिडून म्हणाला.
“प्रेमात मोठी शक्ती असते राहुल, जर तुमचे प्रेम खरे असेल तर एकमेकांपासून तुम्ही कधीही दूर जाऊ शकणार नाही राहुल, काळजी करू नकोस, आम्ही अनघालाही समजाऊ.” अमन समजावणीच्या सुरात बोलला.
“नाही, मला आता सहन होत नाही. मला आता माझ्यासाठी दुसरा जोडीदार शोधावा लागेल,” राहुल तुटकपणे म्हणाला.
“हे सोपे नाही आणि हा अन्याय आहे राहुल. तुला घरी बायको एक बायको आहे. आणि आईबाबांना, तुझ्या छोट्या भावाला काय सांगशील तू ह्याबद्दल?” अमन आता आश्चर्यचकित झाला होता आणि त्याला राहुलचा रागही आला होता.
“असली कसली बायको आहे रे ती जी माझ्याशी बोलतही नाही? शेवटी, मी पण एक माणूस आहे, मलाही प्रेम हवे आहे, मलाही शाररिक गरजा आहेत. मी कुठे जाऊ? मी आता माझ्यसाठी साथीदार शोधायलाही सुरवात केली आहे.” राहुलने आपले स्पष्टीकरण दिले.
“अरे राहुल, बायको काय फक्त ह्याचसाठी असते का? जरा विचार कर, दुसर्याला इम्प्रेस करण्यात आणि तिला आपली बनवण्यात जितकी मेहनत, पैसा आणि वेळ घालवला असशील, त्यापेक्षा कमी वेळात अनघा आपोआप तुझ्या कुशीत येईल आणि तिलाही तुझी गरज आहेच की!” नीता राहुलला समजावत म्हणाली.
“राहुल, तुझे खरे प्रेम तर तुझ्याच घरात आहे. मग तू बाहेर तुझे प्रेम शोधण्यात आयुष्य का वाया घालवत आहेस? एक्सट्रा मॅरिटल अफेयरचा काय भरवसा? मृगजळ निघाले तर? समाज आणि कायद्यालाही मर्यादा असतात. शेवटी नैतिकता नावाची पण काही गोष्ट असतेच ना?
मित्रा, घरातल्या अनघा नावाच्या मुलीला तुझी मैत्रीण मानून परत नव्याने तिला पटवण्याचा का प्रयत्न नाही करत? शेवटी लग्नाआधीही तू तिच्याशी खूप फ्लर्ट करीत होतास.” असं म्हणत अमनने डोळे मिचकावले आणि इच्छा नसतानाही राहुल हसला, “परत बायकोसोबत प्रेम करण्यात कुठलाही धोका नाही किंवा समाज आणि कायद्याची भीती नाही.” अमन म्हणाला.
यावर सर्वजण मोठ्याने हसले. अमन पुढे म्हणाला, “राहुल, असे चढ-उतार तर प्रत्येक कुटुंबात येत राहतात. याचा अर्थ नव्हे की परिस्थिती हाताळण्याऐवजी दुसरा साथीदार निवडावा.”
“असे का? मग समजा मी जर तुला सोडून गेले तर तू काय करशील?” नीताने मानला गमतीने विचारले.
“मग मॅडम, आम्ही तुमची विनवणी करू, तुमची समजूत घालू, तुम्हाला पकडून आणू, तुम्हाला फसवू, किडनॅप करू, काहीही करू, पण तुम्हाला आमच्यापासून वेगळे होऊ देणार नाही. तुझ्याशिवाय माझं आयुष्य आहे का?” अमनने नीताच्या हाताला जोरात चिमटा काढत विचारले.
“आई गं! अशा परिस्थितीत तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातून सुटण्याची हिम्मत कोणात आहे,” नीता कळवळून पण हसत म्हणाली.
अमन आणि नीताच्या घरातून परतताना राहुलला खूप हलकं वाटत होतं. एक मोठं ओझं डोक्यावरून उतरल्यासारखे त्याला वाटलं.
दुसऱ्या दिवशी अमन आणि नीताने अनघालाही संध्याकाळच्या चहासाठी एकटीला बोलावले, पण त्यांच्या राहुलसोबत झालेल्या संभाषणाबद्दल तिला सांगितले नाही.
“हे बघ अनघा, अशी घुसमटून का जगतेयस? काय प्रॉब्लेम आहे?” चहा पिता पिता नीताने अनघाला विचारले.
“नीता, राहुल आता पूर्वीचा ‘माझा राहुल’ राहिलेला नाहीये. पूर्णपणे बदललाय गं तो.” अनघाच्या डोळ्यात पाणी आणि आवाजात वेदना होती. म्हणाली. “तसं नाहीये. तुम्ही दोघेही एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतायत. राहुल तुझा छळ करतो का? तुझ्यावर अत्याचार करतो का? तो घरची जबाबदारी टाळतोय का?” अमनने अनघाला एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले.
“नाही नाही, तसे नाही. ह्यातले तो काही करत नाही. घरातल्या त्याच्या जाबदाऱ्या पण तो तालात नाहीये. पण त्याचे माझ्यावरचे प्रेम संपले आहे. माझ्याही काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. कधी कधी मलाही असं वाटतं की कोणीतरी असावं ज्याच्यासोबत मी माझं मन हलकं करू शकेन,” अनघा रडतच म्हणाली.
“हे बघ अनघा, तुम्हा दोघांच्या मनातील एकमेकांबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. पण अहंकारातून जन्मलेली एक वाळवी आहे आहे जी तुम्हा दोघांनाही खात आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्याही आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी तुम्हा दोघांनाही दुसर्या जोडीदाराचे आकर्षणही आहे.
आपली चूक एवढीच असते की घरात प्रेम असूनही आपण ते बाहेर शोधतो, हे माहीत असूनही की ते शोधणे फार कठीण आहे, अशक्य आहे. कृपा करून तुम्ही दोघंही स्वतःच्या अहंकारापोटी तुमच्या प्रेमाचा गळा दाबू नका.
काही वेळ शांत राहिल्यानंतर नीता म्हणाली, “अनू, नवरा बायकोच्या नात्यामध्ये कसला आलाय गं अहंकार? या अहंकाराने आणि अबोल्यानें अनेक संसार उध्वस्त केले आहेत. राहुल अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला खात्री आहे की राहुलला देखील तू हवी आहेस. तू कमीत कमी पुढाकार तरी घे.” नीताने अनाघापुढे आपले म्हणणे मांडले.
“नाही नीता, मी आता हे करू शकत नाही,” अनघा निराशेने म्हणाली.
“अगं अनू, जरा राहुलला समजून तरी घे. एक पाऊल तू पुढे तरी टाकून बघ. राहुल बघ कसा धावत येतो मग तुझ्याकडे! तू फक्त त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव कर आणि मग बघ राहुल जन्मभर फक्त तुझाच होऊन राहील.” हे सारे ऐकून अनघाला बरे वाटले.
अमन आणि नीताचा प्लॅन सक्सेसफूल झाला होता. अनघा घरी पोहोचली तेव्हा ती हरिणीसारखी आनंदी होती. तिने घरी येऊन पाहिलं तर राहुल बेडवर पडून होता. त्याच्याकडे पाहून अनघाच्या मनात त्याच्याबद्दल करूणा दाटून आली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. कितीतरी वेळ ती चोरून त्याच्याकडे पाहत राहिली.
तो तिला एखाद्या निरागस मुलासारखा वाटत होता. बऱ्याच दिवसांनी ती त्या राहुलकडे पाहत होती, जो कधी काळी तिचा प्रियकर होता, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती. प्रेमात असतानाच्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळल्या. हा तोच राहुल आहे का, ज्याच्याशिवाय मी क्षणभरही जगू शकत नव्हते, मग आता काय झालंय?
बऱ्याच वेळ अनिमिष नजरेने ती त्याच्याकडे पहाताच राहिली. प्रेमाच्या आवेगात धीर धरून ती त्याच्याजवळ गेली. राहुल झोपला होता. ती त्याच्या बाजूला पडून बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. शेवटी, जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून निर्माण होणाऱ्या अशा अहंकाराचा उपयोग काय? खरा विजय हा एकमेकांप्रती असलेल्या प्रेमात आहे, अहंकारात नाही. भावनेच्या भरात तिने राहुलला घट्ट मिठी मारली.
राहुल दचकून उठला. ” अनू तू? काय झालं गं?” राहुलने घाबरून तिला विचारलं आणि अनघाने मिश्किल स्मितहास्य करून राहुल कडे पाहात डोळे मिचकावले. राहुलच्या मनात प्रेमाची लाट उसळली. त्याने अनघाला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे कडकडून चुंबन घेतले. “इतके दिवस काय झाले होते गं आपल्याला?” अनघा त्याच्या मिठीत जणू सामावून गेली होती. दोघेही बराच वेळ असेच एकमेकांच्या मिठीत राहिले.
तेव्हा राहुल म्हणाला, “अनू,चूक माझीच होती. तुला सोडून मी बाहेर सुख शोधत होतो, पण माझा सर्वात मोठा आनंद माझ्या घरातच होता. मला माफ करशील ना गं मला?”
अनघाने पटकन राहुलच्या ओठांवर बोट ठेवल आणि म्हणाली, “अहं! असं नाही बोलायचे. माफी तर मला मागायला हवी. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला त्रास देत राहिले, तरीही तू काहीच बोलला नाहीस. आता माझी एक विनंती ऐकशील?” “काय गं माझ्या राणी?” राहुलने तिला विचारले.
“आता आपण जुन्या साऱ्या गोष्टी विसरून, हे घर सोडून सर्वांसोबत एकाच घरात राहूयात. मला खात्री आहे की आई – बाबा नक्की मला माफ करतील.” थोडावेळ थांबून राहुल म्हणाला, “अनू, मला तुला शिक्षा करायची आहे.” “काय?” अनघाला धक्काच बसला.
“कसली शिक्षा?” तिने विचारले. प्रत्युत्तरात राहुलने आपले ओठ अनघाच्या ओठांवर ठेवले आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्यातील सर्व गैरसमज आता मिटून त्याची जागा निरामय प्रेमाने घेतली होती.
समाप्त
हे ही वाचा: तुजविण सख्या रे – भाग १
Pingback: तुजविण सख्या रे - भाग १ | नवरा बायको कथा | हृदयस्पर्शी कथा - Help Diva