माझे नाव पूजा आहे. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. आतापर्यंत मी एक आनंदी मुलगी होते. माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मला अभिषेकचे प्रपोजल आले. मुलगा चांगला शिकलेला होता, डिसेन्ट होता, त्याचा घरचा बिजनेस होता. घरात पैशाची काहीही कमतरता नव्हती.
नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. लवकरच माझे अभिषेकशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्न छान मोठ्या घरात झाल्यामुळे मी आणि माझे आईबाबा फार खुश होतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. लग्न होऊन मी सासरी आले.
अभिषेक त्याच्या सावत्र आईसोबत राहात होता. थोड्या महिन्यांपासून त्याच्या सावत्र लहान बहिणीचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती देखील माहेरी येऊन राहिली होती. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. मी आमच्या रूममध्ये जाणार इतक्यात सासूने आणि माझ्या नणंदेने मला त्यांच्या रूम मध्ये बोलावले.
त्यांच्या रूममध्ये जाताच मला जाणवले कि दोघींचे चेहरे उदास आणि घाबरलेले होते. जणू काही त्या दोघींना मला काहीतरी सांगायचे होते. मी त्यांना विचारले,”काय झाले, तुम्ही दोघीही इतक्या घाबरलेल्या का दिसतायत?”
त्यावर माझी सासू म्हणाली,”बेटा, आम्हाला तुला काहीतरी सांगायचे आहे. पण तुला हे सगळे मोठ्या हिमतीने ऐकावे लागेल. आता आम्ही तुला जे काही सांगणार आहोत, ती गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच ठेव. घर आता नातेवाईकांनी भरलेले आहे, इथे बातमी पसरायला जास्त वेळ लागत नाही आणि ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आमच्या घरची इज्जत जाईल. आता तू या घराची सून आहेस आणि तुला या घराचा मान राखायचा आहे. सावत्र असले तरी अभिषेकाची मला खूप काळजी वाटते.”
सासूबाईंचे बोलणे ऐकून मी खरे तर थोडी घाबरले. मी त्यांना म्हणाले,”आई, काय प्रकरण आहे ते तुम्हीच सांगा.” सासू म्हणाल्या,”मुली, माझा मुलगा हा पुरुष नाहीए.” हे ऐकून मला धक्काच बसला.
मी म्हणाले,”आई, काय बोलताय तुम्ही हे? आणि मला तुम्ही आता का सांगताय हे? असे असेल तर तुम्ही तुमच्या मुलाशी माझे लग्न का लावून दिले? माझे जीवन का बरबाद केले?”
यावर माझी सासू म्हणाली,”बेटा, मला माहित आहे तू असा विचार करत असशील की हे सगळे माहित असूनही आम्ही तुझे जीवन का बरबाद केले? तुला लग्नाच्या या बेडीत कशाला अडकवलं? पण विश्वास ठेव पोरी. पण आमचा पण नाईलाज आहे. जर ही गोष्ट लोकांना समजली तर आपली किती बदनामी होईल? तूच विचार कर. म्हणून इच्छा असूनही ही गोष्ट आम्हाला तुला लग्नाआधी सांगता आली नाही. मला माफ कर बेटा!!”
हे सारे ऐकून मी सुन्न झाले. असे वाटले कि माझ्या कानात कुणीतरी शिशाचा रस ओतते आहे. सासूबाई पुढे बोलू लागल्या,”माझा मुलगा अनेकदा रात्री बाथरूममध्येच राहतो. मला माहित नाही की तो तिथे काय करतो, पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो की त्याचे पोट खराब आहे. पण तो खोटं बोलत असतो.”
माझी नणंद पुढे म्हणाली,”वहिनी, तू दादासोबत थोडा वेळ घालव आणि मग त्याच्याशी मनमोकळेपणाने या विषयावर बोल, काही करता आले तर आपण सगळे नक्कीच करू. तू काही एकटी नाहीस.आम्ही दोघीही तुझ्या सोबत आहोत.”
लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री माझ्या पतीबद्दलच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मला काय करावे ते समजत नव्हते. आता मला माझ्या खोलीत जायची देखील भीती वाटू लागली. सासूबाईंनी दिलेले दूध घेऊन मी चुपचाप माझ्या खोलीत आले आणि बेडवर येऊन बसले.
विचार करत असतानाच माझा नवरा अभिषेक खोलीत आला. खोलीचा दरवाजा बंद केला. मी त्याला दूध दिले. त्याने दूध पिऊन माझ्याशी बोलायला सुरवात केली. अशीच जेमतेम पाच मिनिटे गेली आणि अभिषेकने त्याचे पोट बिघडल्याचे मला सांगितले आणि काही सेकंदातच तो उठून बाथरूममध्ये गेला. अगदी माझ्या सासूने मला सांगितल्याप्रमाणेच घडले.
जवळपास तासभराने अभिषेक बाथरूममधून बाहेर आला. विचार करत करत मी बेडवर पडले. मला आता त्याच्याशी बोलावंसं वाटत नव्हतं. तोही शांतपणे त्याच्या बेडच्या बाजूला जाऊन झोपला. माझी फसवणूक झाल्याचे मला वाटत होते. रात्रभर मला झोप आली नाही. सकाळी लवकर उठून मी बाथरूमला गेले.
बाथरूममध्ये जाताच मी हादरले. बाथरूममध्ये एक नवीन नाईटी आणि मेकअपचं सामान होते. मला समजले नाही कि माझ्या नवऱ्याला ह्या सगळ्यांचा काय उपयोग? अरे देवा! अशा व्यक्तीशी माझे लग्न का झाले? सकाळी माझ्या सासूने आणि नणंदेने मला विचारले कि रात्री काय झाले?
मी सासूला म्हणाले,”आई, अगदी तुम्ही मला जे सांगितले होते तसेच झाले.” आणि मी रडू लागले. मला रडताना पाहून माझी नणंद सासूला म्हणाली,”आई, तरी मी तुला सांगत होते कि दादाचे लग्न नको करूस. उगीच अशा प्रकारे कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब नको करूस, पण तुम्ही सर्वांनी माझे ऐकले नाही. आता ती अशीच घुसमटून इथे राहणार का?”
यावर माझी सासू म्हणाली,”बेटा तू जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण माझ्या मुलाचे हे गुपित तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही असे वचन तुला द्यावेच लागेल.” मी तसे वचन माझ्या सासूला दिले.
दुसऱ्या दिवशी रात्री अभिषेक खोलीत आला. पण मला आता त्याच्याकडे बघावेसे पण वाटत नव्हते. मी शांतपणे बेडवर पडून होते. अभिषेक येऊन बेडवर बसला आणि थोडावेळ बसूनच होता. त्याने मला हाक मारली, पण मी झोपल्याचे नाटक केले. अभिषेक मग उठून बाथरूमला गेला. तो काय करायला गेला होता हे ते मला समजले.
काही वेळाने बाथरूममधून वस्तू पडल्याचा आवाज येऊ लागला. थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला आणि तो बाथरूममधून बाहेर आला. मात्र यावेळी तो पटकन बाहेर आला. येऊन बेडवर झोपला. आमच्यात काहीच घडत नव्हते. काय करावं हा विचार मनात येत होता. विचार करत करत रात्री केव्हातरी मी झोपी गेले.
सकाळी लवकरच मला जाग आली आणि उठून मी बाथरूमला गेले. मात्र यावेळी बाथरूममध्ये गेल्यावर सर्व सामान विखुरलेले होते. नवीन नाईटी फाटलेली होती आणि मेकअपच्या वस्तू विखुरलेल्या होत्या. एक कागद चुरगाळून फेकला होता. मी उत्सुकतेने तो कागद उचलून पहिला. त्यावर ‘To ‘My Beautiful Wife’ असे लिहिले होते.
मी एकदम गोंधळून गेले. अभिषेकने या साऱ्या वस्तू माझ्यासाठी आणल्या होत्या? पण मग माझ्या सासूने आणि नणंदेने मला अभिषेकबद्दल सांगितलेल्या गोष्टी? माझ्या मनात एक शंका आली की त्याने नाईटी आणि मेकअपचे सामान माझ्यासाठी कुठेतरी ठेवले असतील. पण नंतर वाटले की सासू आणि माझी नणंद माझ्याशी खोटं का बोलतील? त्या दोघी तर माझी खूप काळजी घेत होत्या.
घरच्या कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हत्या. मला काहीच कळेना. मी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आले. अभिषेकशी थेट बोलूनच विचारावे असे ठरवले. पण नेमकेच तो ऑफिसला लवकर निघून गेला होता. सासू आणि नणंद दोघीही शॉपिंगला गेल्या होत्या. कुणाशी बोलावं बरं?
माझ्या सासरच्या घरात एक जुनी मोलकरीण होती, शांताआजी. ती अनाथ होती. तिचे कुणी नातेवाईक नव्हते. तिने अभिषेकला अगदी बाळ असल्यापासून वाढवले होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. आता वयोमानाने तिच्याकडून काम होत नसे, पण अभिषेकने तिला तिच्या गावी परत न पाठवता तो तिला सांभाळत होता.
मी तिच्याशी बोलायचे ठरवले. मी तिच्या खोलीत गेले. ती देवपूजा करत होती. मी तिला विचारले,”शांताआजी, अभिषेक स्वभावाने कसा आहे?” ती म्हणाली,”खूप सरळ आहे गं तो. त्याला सगळेच चांगले वाटतात. पण तुझ्या सासूपासून आणि नणंदेपासून तू सावध राहा.”
शांताआजीच्या अशा सरळ सरळ बोलण्याने मी हडबडूनच गेले. “असे का बोलता आहेत तुम्ही आजी?” मी गोंधळून विचारले. शांता आजी म्हणाली,”अगं, तुझी सासू आणि नणंद ह्या दोघीही फार लालची आहेत. अभिषेकच्या प्रॉपर्टीवर दोघींचा डोळा आहे. तुझ्याशी लग्न व्हावे असे ह्या दोघींच्याही मनात नव्हते.
अभिषेकने तिच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे अशी तुझ्या सासूची फार इच्छा होती. पण ती मुलगी अजिबात चांगली मुलगी नाहीये, म्हणून अभिषेकने तिच्याशी लग्न करायला सरळ सरळ नकार दिला. ह्याचा राग मनात ठेवलाय तिने! तुझी नणंददेखील तिच्या सासरच्या लोकांशी भांडून इथे येऊन राहिली आहे. घरी परत जायचे नाव घेत नाहीए.
तुला काही त्या दोघी या घरात सुखाने संसार करू देणार नाही. तू अभिषेकला सोडून या घरातून दूर जावे यासाठी त्या दोघीही प्रयत्न करत असतील. तू सावध राहा.” आता मला या दोघींचा डाव लक्षात आला. मी उठून सासूच्या खोलीत गेले. त्या दोघी अद्याप शॉपिंगवरून परत आल्या नव्हत्या.
पण सासूच्या बेडशेजारच्या साईड टेबलवर मला जुलाबाची बाटली दिसली आणि झालेला सगळा प्रकार मला लक्षात आला. माझ्या सासूनेच दुधातून अभिषेकला जुलाबाचे औषध दिले आणि त्याचे पोट बिघडले. म्हणून तो रात्रभर बाथरूम मध्ये जातयेत होता. आणि ती नाईटी आणि मेकअपचे सामान त्याने माझ्यासाठी आणले होते, जे त्याच्यावरच्या संशयापायी मी पाहिले पण नाही. बिचारा अभिषेक! त्याची काय चूक?
नाही! आता बास झाले! माझ्या ह्या भोळ्या नवऱ्याला मी त्या दोघींच्या षडयंत्राला बळी पडू देणार नाही. ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लावूनच राहीन. मी दिवसभर अभिषेक घरी येण्याची वाट पहिली. रात्री उशिरा तो घरी आला. जेवण आटोपल्यावर आम्ही दोघेही रूम मध्ये गेलो.
दोन दिवस मी बिचाऱ्याशी नीट बोललेही नव्हते. त्याचा चेहरा उदास होता. पण आज पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलणार होतो. तो येताच मी म्हणाले, “अभि, मला तुझ्याशी बोलायचे आहे.” तो जरा घाबरला,”काय झाले पूजा? तुला ह्या घरात काही त्रास होतोय का?” “नाही रे! तसं नाहीये.” मी म्हणाले. आणि मग झाला सगळा प्रकार मी अभिषेकला एका दमात सांगून टाकला.
अभिषेक अवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिला. तो मला म्हणाला,”अगं ती नाईटी आणि मेकअपचे सामान मी तुझ्यासाठी आणून बाथरूम मध्ये ठेवले होते. मी तुला अशाप्रकारे गिफ्ट द्यावे अशी माझ्या बहिणीचीच आयडीया होती. आपल्यात गैरसमज होऊन वेगळे व्हावे असा डाव त्या दोघींनी रचला होता.
आईला आणि माझ्या छोट्या बहिणीला माझ्याबद्दल फारशी माया कधीच नव्हती, पण त्या दोघी माझा संसार उध्वस्त करण्यासाठी ह्या थराला जातील ह्याची मला कल्पना नव्हती. आता काय करायचे?” त्याने काळजीने मला विचारले. “आता जे काही करायचे असेल ते मी करेन, तू चिंता करू नकोस.” “येस छोट्या मालकीणबाई!” अभिषेक खुशीत येत म्हणाला आणि त्याने मला त्याच्या बाहुपाशात खेचून घेतले आणि त्या रात्री खऱ्या अर्थाने आमची मधुचंद्राची पहिली रात्र साजरी झाली.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी किचन मध्ये काम करता करता खुशीत गाणे गुणगुणत होते. मला खुश बघून माझी सासू आणि नणंद थोड्या गडबडल्याच. पण तसे न दाखवता माझी सासू म्हणाली,”काय झाले पूजा? आज खुश दिसतेस? काय निर्णय घेतलास मग तू? माहेरी परत जाणार आहेस का?”
“माहेरी? आणि मी? मी का माहेरी जाऊ? पण नणंदबाई मात्र जाणार आहेत त्यांच्या सासरी. हे ताईंचे दुपारच्या ट्रेनचे तिकीट त्यांच्या घरी परत जायचे.” मी माझ्या सासूला म्हणाले. हे ऐकुन माझ्या नणंदेचा पारा चढला. ती रागाने बोलली,”मी नाही जाणार. तू कोण आलीस मला माझ्या सासरी परत पाठवणारी?” “मी घरची मालकीणबाई! आणि मी ठरवणार ह्या घरात कोण राहणार आणि कोण नाही ते.” मीही तितक्याच खंबीरपणे तिला उत्तर दिले.
“तू कुणाशी बोलते आहेस ह्याचं भान आहे का तुला? अभिषेक तुझी बायको बघ काय बोलते आहे.” माझी सासू गरजली. अभिषेक म्हणाला,”बरोबर बोलते आहे ती. छोटीला तिच्या घरी परत जायलाच हवे आणि आई तुला पण इथे राहायचे असेल तर आमच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर तुलादेखील गावी पाठवून देईन.आता आम्हाला सगळे माहित पडले आहे.”
हे ऐकून माझी सासू गडबडलीच. घाबरून ती बोलली,”बेटा, मला माफ कर. संपत्तीच्या मोहापायी हे मी सगळं केले. परत अशी चूक होणार नाही. मला एक संधी देऊन बघ. पुन्हा असला प्रकार होणार नाही. मी आजच छोटीला तिच्या घरी पाठवून देते.” हे ऐकताच छोटी रागारागाने पाय आपटत तिच्या खोलीत पॅकिंग करण्यासाठी निघून गेली.
मी अभिषेकला म्हणाले,”ठीक आहे, आता आपण हे प्रकरण इथेच संपवू, ह्या दोघींना माफ करू आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू.” अभिषेकनेही मग प्रकरण जास्त न ताणता त्याच्या सावत्र आईला आणि बहिणीला परत एक संधी देण्याचे आणि परत नव्याने सुरवात करायचे ठरवले. झाला सगळा प्रकार पाहात शांताआजी कोपऱ्यात बसून खुदुखुदू हसत होती.
समाप्त