तीन वर्षांपूर्वी अनेक मुली पाहून शेवटी मोहितने स्वराला आपली बायको म्हणून निवडले होते. स्वरा दिसायला खूप सुंदर, मनमोहक, संस्कारी अशी होती. मोहित आणि स्वरा ही जोडी अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा वाटावा अशी होती.
आपली निवड अगदी योग्य आहे असे दोघांनाही वाटत होते. लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस तर जणू दोघे स्वर्गसुखच अनुभवत होते.
ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्यात खूप प्रेम होते. कुठेही निघाले तरी ते दोघे कायम सोबत असत. लोकही त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत राहत.
असे छान दिवस आनंदात जात होते. दोन वर्षे कशी सरली हे कळालेच नाही आणि सगळेच वाट पाहात असलेली गोड बातमी कानावर आली.
मोहित आणि स्वरा आई-बाबा होणार होते. घरात तर आनंदाला अगदी उधाण आले होते. मोहित स्वराची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत होता. असेच दिवस सरत होते. आपल्या होणाऱ्या बाळाचं स्वप्न पाहत दोघेही खूप खुश होते.
मुलगा असो वा मुलगी, ते आपले लाडके पिल्लू असेल, असे दोघांनाही वाटत होते. बाळासाठी आपण कुठेही कमी पडायचे नाही, चांगले संस्कार द्यायचे, त्याच्या उज्वल भविष्यासाठी जमेल ती तरतूद करायची, असे दोघांनीही ठरवले होते.
अखेर तो दिवस आला. प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे जेव्हा ते आईबाबा बनतात. आपल्यापासून एक नवीन जीव जन्माला आलेला असतो. मोहित आणि स्वराही खूप खुश होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
छानशी गोंडस परी जन्माला आली होती. तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्यासाठी ते दोघे काहीही करायला तयार होते. असेच दिवस जात होते. परी हळूहळू मोठी होत होती. मोहित आणि स्वरा तिला अगदी फुलाप्रमाणे जपत असत. तिला काही दुखले, खुपले तर दोघांचाही जीव कासावीस होत असे. तिच्या आजारपणात दोघेही रात्रभर जागत.
परीचे आईपेक्षा वडिलांवर जास्ती प्रेम होते. तिला कायम तिचा पप्पा जवळ असावा असे वाटत असे आणि मोहीतची देखील ती लाडाची लेक होती. तिच्या भविष्यासाठी मोहितने स्वतःला कामात पुरते गुंतवून घेतले होते. स्वरा परीची काळजी घेता घेता सर्वच विसरून गेली होती, अगदी मोहीतला देखील!
तिचे मोहितवरील लक्ष आता कमी होऊ लागले होते. दोघांमध्ये संभाषण खूप कमी व्हायला लागले होते. हळूहळू दोघांना एकमेकांच्या काही गोष्टी खटकायला लागल्या आणि त्यांच्यात छोट्यामोठ्या कुरबुरी चालू झाल्या.
ही Marathi Story आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
दोघांच्याही नकळत ते एकमेकांपासून फार लांब चालले होते. मोहितने ठरवले, आता आपण फक्त आपल्या कामात लक्ष द्यायचे. तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या ऑफिसमध्ये घालवायला लागला.
तिथेच त्याची ओळख नुकतीच जॉईन झालेल्या मायासोबत झाली. माया दिसायला अगदी साधी, सावळी पण आकर्षक होती, सुस्वभावी होती. आपल्या कामात तरबेज होती. कोणावरही मोहिनी घालेल अशीच ती होती.
हळूहळू मोहीतला मायासोबत वेळ घालवणे आवडू लागले. तो नकळतपणे तिच्याकडे आकर्षित झाला. त्या दोघांमध्ये मैत्रीदेखील वाढायला लागली. माया मला खूप समजून घेते, माझ्या प्रत्येक निर्णयातही सहभागी असते, असे त्याला वाटू लागले. एव्हाना दोघांची मैत्री खूप घट्ट झाली होती. मायाचा सहवास मोहीतला आवडायला लागला होता.
एकमेकांचे पर्सनल प्रॉब्लेम्स दोघेही आता शेअर करायला लागले होते. मायाकडून मोहीतला समजले कि माया एक सिंगल मदर आहे. तिलाही एक मुलगी आहे. नवरा सोबत राहत नाही. मुलीची जबाबदारी तिच्यावरच आहे. हे ऐकून मोहीतला फार वाईट वाटले. आपण हिला कशाप्रकारे मदत करावी ह्याचाच विचार त्याच्या मनात चालला होता.
इकडे स्वरा पुरती एकटी पडली होती. तिच्यात आणि मोहितमध्ये खूप दुरावा निर्माण झाला होता. परीची काळजी मात्र मोहित घेत होता. पण सध्या त्याच्या मनात फक्त मायाचाच विचार चालला होता. आपण मायाची जबाबदारी उचलली पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्याच्या मनात विचार आला, जर आपण मायालाच साथ दिली तर?
एके दिवशी रविवारी सुट्टी असताना परिवारासोबत वेळ घालवायचा सोडून मोहित मायाच्या ओढीने तिच्या घरी गेला. त्यावेळी त्याने मायाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला मायाकडून समजले कि तिचा नवरा दुसऱ्या एका बाईसाठी तिला आणि तिच्या मुलीला सोडून गेला होता.
हे ऐकूम मात्र मोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पुरता हादरला. मायाच्या नवऱ्याने जे केले त्याबद्दल मोहीतला त्याचा राग आला होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरु होते. एक मन म्हणत होते कि मायासोबत राहावे तर एक मन स्वराकडे आणि परीकडे ओढ घेत होते. हे मायाबद्दल जे वाटतंय ते नक्की काय आहे?
प्रेम, काळजी, आकर्षण कि सहानुभूती? त्याने विचार केला, मायाचा नवरा किती चुकीचे वागला. पण जे मायाच्या नवऱ्याने तिच्यासोबत केले तेच तर मी स्वरासोबत नाही ना करत? आणि या विचाराने तो सुन्न झाला. त्याच्या लक्षात आले की हे चुकीचे आहे. स्वरा आणि परी ह्या माझ्या प्रथम जबाबदाऱ्या आहेत.
आपण किती स्वार्थी वागलो, असा विचार करून तो बेचैन झाला. त्याची चूक आता त्याला पुरती उमगली होती. त्याची चूक त्याच्या लक्षात आल्यावर मात्र मोहितने पक्के ठरवले, मायाबद्दल जे काही वाटते, ते तात्पुरते आहे. आपला एक सुखी संसार आहे. आपली प्रेमळ बायको, गोंडस मुलगी ह्यांची जबाबदारी आपल्यावर आहे.
शेवटी नाव समुद्रात कितीही फिरली तरी शेवटी किनाऱ्याच्या ओढीने तिला किनाऱ्याकडे परत यावे लागते, हे मोहीतला अगदी मनापासून पटले. जी चूक मायाच्या नवऱ्याने केली ती आपण कधीही करायची नाही असा निर्धार करून मोहित मायाला म्हणाला,”माया, तू माझी फार जवळची, खूप चांगली मैत्रीण आहेस.
तुला तुझ्या आयुष्यात कधीही, कुठलीही मदत लागली, तर नक्की सांग. जेव्हढे शक्य होईल तितके नक्कीच मी तुझ्यासाठी करेन.” हे ऐकून मायालाही त्याचा आधार वाटला. मनाशी गाठ बांधून मोहित घरी जायला निघाला. त्याच्या मनात सारखे हेच विचार येत होते. आपण किती स्वार्थी, निष्काळजीपणाने वागलो.
आपण असे का वागलो? कसे वागलो? किती वाहवत गेलो. त्याला खूप अपराधी वाटत होते. मोहित घरी पोचला. आज खूप महिन्यांनी त्याने स्वरासाठी मोगऱ्याचा गजरा आणला होता. रोज कटकट करणारी, कंटाळवाणी बायको आज त्याला खूप आकर्षक आणि सुंदर वाटत होती. स्वरा आपल्या आवडीचा गजरा बघून खूप खुश झाली.
परीही लाडीकपणे पप्पा, पप्पा करत जवळ आली. मोहीतला खूप दिवसांनी घरी आल्यासारखे वाटत होते. तो खूप खुश होता. त्याने प्रेमाने दोघींचीही विचारपूस केली. मोहितचे हे बदललेले रूप पाहून स्वराही खुलली. तिने विचार केला, माझ्याकडूनही चुकलंच. मी मोहीतला कायमच गृहीत धरले. जेव्हा त्याला वेळ द्यायला पाहिजे होता, तेव्हा त्याला तो दिला नाही.
त्याला समजून घ्यायला मी कमी पडले. आता मात्र मी अशी चूक करणार नाही, असा तिने मनापासून निश्चय केला. आज खूप दिवसांनी मोहित आणि स्वरांमध्ये प्रेमळ संवाद झाला. दोघांनीही आपल्या चुकांची कबुली दिली. त्यांच्या जुन्या, प्रेमळ आठवणी दोघांनाही आठवल्या. आज स्वराशी बोलताना मोहीतला ती खूपच लाघवी आणि गोड वाटत होती.
त्याला अगदी लग्नाच्या सुरवातीच्या दिवसातील स्वरा आठवली आणि तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला. परीच्या चेहऱ्यावर पण हास्य होते. ती आनंदाने इकडे, तिकडे बागडत होती. खूप दिवसांपासून आज जे हरवले होते, ते आज गवसले हो!!!
समाप्त
मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही Marathi story कशी वाटली? आपला अभिप्राय नक्की कळवा.