माझे नाव नीता आहे. माझे लग्न खूप छान घरात झाले होते. माझा नवरा शंतनू खूप प्रेमळ, समजूतदार आणि लाखात एक असा होता. यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू शकले नसते. असा पती मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे.
आमच्या लग्नाला जवळपास 16 वर्षे झाली आहेत. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आमची मुलगी 14 वर्षांची आहे, तर मुलगा 10 वर्षांचा आहे. देवाच्या कृपेने आमचे एक सुखी कुटुंब आहे.
माझ्या पतीचे एक कपड्यांचे दुकान आहे. व्यवसायही चांगला चालला आहे. ज्यातून आम्हाला चांगली कमाई होते. माझे आयुष्य असेच सुरळीत छान चालले होते. पण नंतर एक गोष्ट घडली ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
एके दिवशी शंतनू घरी आला तर त्याचा मूड ऑफ होता. मला वाटले ऑफिसमध्ये कामाचा ओव्हरलोड असेल. मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी पटकन त्याचा फेवरेट आल्याचा चहा आणि कांदाभजी बनवली.कांदाभजी दिसली कि शंतनूची कळी पटकन खुलते. पण आज तो खूपच गंभीर दिसत होता.
तो मला बोलला,”नीता, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.” मी म्हणाले,”बोलशील रे! पहिल्यांदा चहा आणि भजी घे.” पण शंतनूचे माझ्याकडे लक्षच नव्हते. कुठल्यातरी गहन विचारात तो गुंतला होता. “काय झाले शंतनू? तुला बरे वाटत नाहीये का?” मी काळजीने विचारले.
शंतनू म्हणाला,”आता मी जे तुला सांगणार आहे ते अजिबात कांगावा न करता शांतपणे ऐक. माझे एक वर्षांपासून दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. त्यासाठी मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय?” “काय? हे काय चाललाय शंतनू? कशाला अशी मस्करी करतोयस माझी? मला अजिबात आवडत नाही असली मस्करी?” मी वैतागून म्हणाले.
“मस्करी नाहीये नीता. मी खरे तेच म्हणतोय. मला आता तुझ्यात इंटरेस्ट उरला नाहीये. माझी एक गर्लफ्रेंड आहे तृप्ती. आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे.” शंतनू गंभीरपणे म्हणाला. “अरे पण तुला काही समजतेय का तू काय बोलतोस ते? १६ वर्षांचा दृष्ट लागण्याजोगा संसार आहे आपला. पदरी दोन मुलं आहेत. त्यांच्या भविष्याचे काय?” मी आता जाम चिडले होते.
ही मराठी कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
“अगं! पुढचे ऐकून तरी घे. जरी मी तृप्तीशी लग्न करणार असलो तरी तुला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. तुझी आणि मुलांचीही जबाबदारी मी घेईन, तू काळजी करू नकोस. मी तजवीज करून ठेवलीये तुमच्या भविष्याची. दर महिन्याला दोन लाख रुपये तुझ्या अकाउंटवर जमा होतील. शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे एफडी करून ठेवले आहेत. तुम्हाला माझ्याविना आयुष्यात काही कमी पडणार नाही.” शंतनूने मला चक्क पैशाचा हिशोब ऐकवला.
“अरे राजा! मला, मुलांना पैसे नकोयेत रे! तू हवा आहेस. इतकी वर्ष आपण छान संसार केला आणि आज अचानक तू असा सांगतोयस कि तुला माझ्यात इंटरेस्ट नाही म्हणून? अशी काय चूक झाली रे माझ्याकडून?” मी अगतिकतेने विचारले.
मी इतकी वर्ष शंतनूला चांगलेच ओळखत होते. शंतनू माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलतो हे मला चांगलेच माहीत आहे. पण मला इतके दिवस त्याने फसवले कसे? गेले एक वर्ष त्याचे त्याचं अफेअर चालू आहे आणि मला ते कळलंही नाही? एकतर तो खोटे बोलत होता किंवा तो खूप हुशार होता. सुरुवातीला मला वाटले की तो मस्करी करत आहे पण ही काही मस्करी नव्हती. हे सगळे खूप भयानक होते. मला काही सुचत नव्हते. अद्यापही विश्वास बसत नव्हता.
मी शंतनूला म्हटले,”तू काही असे करशील यावर माझा अद्यापही विश्वास बसत नाहीये. तुझे अफेयर खरे असेल तर तू तृप्तीला उद्या इथे बोलावं. तिला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मला ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.” “ठीक आहे. मी उद्याच तिला बोलावतो. त्यानंतर मी घटस्फोटासाठी अप्लाय करेन. त्यासाठी आपल्याला आधी सहा महिने वेगवेगळे राहावे लागेल. पण मला वेगळे होताना कुठल्याही प्रकारची नाटकं नकोत.” शंतनू कोरडेपणाने म्हणून आत निघून गेला.
माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले होते. मी सुन्नपणे सोफ्यावर बसूनच राहिले. तृप्तीसोबत शंतनूचे खरंच अफेयर असेल तर मुलांना मी काय सांगणार होते? रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनू कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कधी येणार विचारत होता. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तरीही एक मन सांगत होते की हे सारे खोटे असेल.
पण माझ्या दुर्दैवाने हे सारे खरे होते. काही वेळाने दारावरची बेल वाजली. शंतनू दाराकडे धावला. आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती आणि ती आत आली. मी त्या मुलीला आधी पाहिले नव्हते पण ती सुंदर होती. साधारण पंचविशीच्या असावी. शंतनूने माझी तिच्याशी ओळख करून दिली.
ती खरंच तृप्ती होती. “नीता, ही तृप्ती. मी माझ्या कामानिमित्त नेहमी शहराबाहेर असतो. गेल्या वर्षी बाहेर कामानिमित्त गेलो असताना मी हिला भेटलो. आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो ते आम्हाला कळलंही नाही. आता आम्ही लग्न करणार आहोत.” हे सगळे ऐकून मला आता भोवळ यायची बाकी होती.
मी ताडकन आत माझ्या रूममध्ये गेले. 16 वर्षांचा विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची कल्पनाही नव्हती. काय झालंय शंतनूला. तो तर तसा नव्हता कधीच. हे त्याचे कोणते रूप मी बघत होते? कदाचित वयानुसार शंतनूचं माझ्याबद्दलचं आकर्षण कमी झालं होतं. पण म्हणून इतक्या टोकाची भूमिका? बरे झाले मुलं शाळेत गेली होती.
नाहीतर तृप्तीला बघून त्यांनी हजार प्रश्न केले असते. तृप्ती गेल्यानंतर शंतनू रूममध्ये आला आणि म्हणाला, “आता तरी तुझी तृप्तीबद्दलची खात्री पटली ना? मी परत सांगतोय, की आपण शांततेत वेगळे होऊया. मी उद्याच घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला देतो.” “शंतनू, मी मुळीच तुला घटस्फोट देणार नाही, मी याच घरात राहणार आहे तेही मुलांसकट. कोणी आपल्या आयुष्यातून जाईल तर ती तृप्ती असेल.” मी शंतनूला माझा निर्णय सांगितला.
हे ऐकून शंतनू त्यावेळेपुरते गप्प बसला. पण दुसऱ्या दिवसापासून तो तृप्तीला रोज घरी बोलवू लागला. माझी मुलं मोठी झाली होती आणि सर्व काही समजू लागली होती. माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची मला कल्पना नव्हती. घरात एक १४ वर्षांची मुलगी आहे. पण शंतनूला त्याच्या वागण्याची अजिबात लाज वाटत नव्हती.
त्याने मुलांशी बोलणेही बंद केले होते. वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटले. एके दिवशी तो तृप्तीसोबत हॉलमध्ये बसला होता. शंतनूने मुलीला तृप्तीसाठी पाणी आणायला सांगितले. ती तृप्तीला पाणी द्यायला गेली आणि चुकून तृप्तीच्या अंगावर मुलीच्या हातून पाणी सांडले. एव्हढ्याशा शुल्लक गोष्टीसाठी शंतनूने मुलीवर हात उचलला.
आता मात्र हद्द झाली. “काय करतो आहेस शंतनू तू? वेडा झाला आहेस का? घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस हे मला माहीत आहे. ठीक आहे, आता तू या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट देईन.” मी शंतनूवर ओरडले. त्याच वेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून रागारागाने माझ्या माहेरी गेले. एक माणूस इतका कसा बदलू शकतो? इतक्या टोकाला जाऊ शकतो? मला आता शंतनूचे तोंडही पाहायचं नव्हते.
जो पूर्वी आपल्या बायकोला आणि मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा, तो त्यांचा इतका तिरस्कार कसा करू शकेल? मला काहीच सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी मला शंतनूचा फोन आला, “मी अजूनही तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईन, तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता, मी पैसे पाठवत राहीन.”
“आम्हाला तुझ्या पैशांची काही गरज नाहीए. या पैशाच्याच जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलंस ना. अशा मुली किती दिवस टिकतात रे? तुझा पैसे तुलाच लखलाभ होवो. आम्ही आमचे पाहून घेऊ.” एव्हढे बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला आणि ओक्सबोक्शी रडू लागले. पण थोडाच वेळ. आता मला रडून चालणार नव्हतं. मुलांच्या भविष्याची जबाबदारी आता माझ्या एकटीवरच होती.
वयाच्या या टप्प्यावर इतकं आरामचं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती. पण आयुष्य तुम्हाला कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही लावता येत नाही. दैवकृपेने मला इतकी वर्षे शंतनूसोबत राहिल्यानंतर मला कपड्यांचा बिझनेसचा चांगलाच अनुभव होता.
मीही माझ्या घरातून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. मला शंतनूकडून अजिबात पैसे घ्यायचे नव्हते. पण शंतनू वेळोवेळी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करत होता. मी पण त्याचवेळी ते पैसे त्याच्या अकाउंटमध्ये परत ट्रान्स्फर करत होते. शंतनू मला पैसे घेण्यासाठी सतत फोन करून रिक्वेस्ट करत होता. पण मी पण एक मानी स्त्री होते. शंतनूकडून पैसे घेणे मला पटत नव्हते. मी त्याला एव्हढेच म्हणाले, “तू आता फक्त घटस्फोटाची काळजी कर, आमची नाही.”
असाच एक महिना निघून गेला. मी हळूहळू कपड्यांचा बिजनेस सुरु केला होता. इतके दिवस शंतनूच्या सोबत राहिल्यावर माल कुठचा आणि कुठे विकत घ्यायचा हे मला चांगलेच माहीत होते. हा अनुभव माझ्या कामी आला. माझी माहेरची लोकं पण मला साथ देत होती. दुसऱ्या महिन्यापासून शंतनूचे फोन येणे बंद झाले. माझं तर आता याकडे लक्षही नव्हतं आणि आता त्याच्याशी बोलायचंही नव्हतं. घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता.
मी फक्त शंतनूला टेक्स्ट करून एव्हढेच सांगितले होते की, तु जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे मला सही करण्यासाठी बोलावशील तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी येईन. आता तू माझ्या आणि मुलांच्या बंधनातून मुक्त आहेस. आम्हाला तुझ्याकडून काहीही नको. मी आता माझ्या कामात लक्ष घालू लागले होते.
एकदा काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते. मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले होते. तिथे नेमकेच मला तृप्ती दिसली. पण ती तिथे कुना दुसऱ्याचाच हात धरून फिरत होती. नक्कीच तिचा नवीन बॉयफ्रेंड असावा. शेवटी तिने माझ्या पतीसोबत पण फसवणूक केल। तिला दुसऱ्याच मुलासोबत पाहून मला आनंद झाला. या मुलीसाठी शंतनूने आम्हाला सोडले. आणि आता? शेवटी ह्या मुलीने तिचे खरे रंग दाखवलेच ना त्याला? आता कोण आहे शंतनूसोबत? कुणी नाही. शंतनू एकटा पडल्याचा आनंद मला झाला खरा! पण क्षणभरच. आता ही तृप्ती ह्या मुलाला पण फसवेल. मग मी मनात विचार केला की आता मी तृप्तीला दुसऱ्या कुणालाही फसवू देणार नाही. म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले.
तृप्ती त्या मुलासोबत एक रेस्टॉरंटमध्ये गेली. मी देखील त्यांच्या पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि सरळ त्या दोघांच्या समोर जाऊन बसले. मलातिथे पाहून तृप्ती हडबडली आणि तिथून उठून जाऊ लागली. पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले आणि त्या मुलाला तिचे सत्य सांगू लागले.
पण त्या मुलाने मला बोलण्यापासून थांबवले आणि पहिल्यांदा आमचे म्हणणे ऐकून घ्या असे म्हणाला. मला वाटले की मी त्याला तृप्तीचे सत्य सांगून त्याचे डोळे उघडेन पण घडले वेगळेच. त्याने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती तडक तिथून टॅक्सी पकडली आणि माझ्या नवऱ्याच्या घरी गेले.
तिथे घरातल्या नोकराने सांगितलं की शंतनू सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटल आमच्या घरापासून फार दूर नव्हते. मी तिथे गेले. रिसेप्शनवर त्याचे नाव सांगून मला त्याचा रूम नंबर कळला. मी रूममध्ये गेले. त्याचा मित्र तिथे होता. शंतनू डोळे मिटून शांतपणे पडून होता. मी तिच्या अंगावर हात ठेवल्यावर त्याने डोळे उघडले.
माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी म्हणाले,”शंतनू, एवढं नाटक करायची काय गरज होती? तू मला आधी स्पष्ट का नाही सांगितलेस?” शंतनूला कँसर झाला होता आणि अडवान्सड स्टेजला होता. डॉक्टरांनी शंतनूचे फक्त ६-७ महिने आयुष्य बाकी आहे असे सांगितले होते. शंतनूला तीळतीळ मरताना आम्ही पाहू नये ही शंतनूची इच्छा होती. म्हणून त्याने तृप्तीसोबत त्याचे अफेयर असल्याचे खोटे नाटकं केले होते.
तृप्ती त्याचा मित्राचीच लहान बहीण होती आणि तिने शंतनूच्या रिक्वेस्ट वरून त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक केले होते. त्याला आमच्या आयुष्यातून दूर जायचे होते. जेणेकरून शंतनूला काही झाले तर आम्हाला वाईट वाटू नये. मी शंतनूसोबत नसून कित्येक तास रडत राहिले. मुलांनाही हॉस्पिटलमध्ये बोलावून झाला प्रकार समजावून सांगितला.
आता आम्ही शंतनूच्या घरी परत राहायला आलो आहोत. सध्या त्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे. पुढच्याच आठवड्यात मी शंतनूला घेऊन पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करत आहे की शंतनू लवकरच बरा व्हावा आणि त्याला काहीही होऊ नये. मला विश्वास आहे की ते नक्कीच होईल.
समाप्त