अनु आणि राहुलच्या लग्नाला १२ वर्ष झाली होती. नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जाण्याअगोदर राहुल अनुसोबत ब्रेकफास्टचा आनंद घेत होता. बोलता – बोलता अचानक अनुने राहुलला विचारले,” राहुल माझ्याबद्दल तुला काय वाटते…?”
राहुल एकदमच बावचळून गेला. त्याला कळेचना कि अनु त्याला असे का विचारते आहे. लग्नाच्या १२ वर्षांनंतर त्याला अशा प्रश्नांची सवय राहिलेली नव्हतीच…!
जेव्हा नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा हे सगळे ठीक होते…
त्यावेळी अनु दिवसातून कमीतकमी एकदा तरी हा प्रश्न त्याला विचारायची.
आणि त्यावेळी त्याच्याकडे खूप भारी भारी उत्तरे तयार असायची.
परंतु लग्न होऊन काही वर्षे झाल्यावर इतक्या सुखाचा संसार चालू असतांनाच अचानकच अनुने आज बाउन्सर टाकला….
राहुल विचारमग्न झाला.पार हादरून गेला. आयला!!! आज अचानक काय झाले हिला?
ही नवरा बायकोचे प्रेम कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
ब्रेकफास्ट झाल्यावर अनु टेबल आवरून आत निघून गेली.
काही वेळात राहुल किचनमध्ये गेला…
तेव्हा त्याला अनुने विचारले, “काय? काही सुचतंय का?”
राहुल म्हणाला, “अगं, सांगण्यासारखे प्रचंड आह पण आता मला वेळ नाही संध्याकाळी सावकाशपणे सांगतो ना”
असे म्हणून तो ऑफिसला निघून गेला….
राहुल घरातून बाहेर पडला खरा पण अनुच्या प्रश्नाचा किडा त्याच्या डोक्यात अजून वळवळत होता…!
पूर्ण दिवस फक्त शब्दांची जुळवाजुळव करण्यातच गेला…
राहुल विचार करत होता… काय सांगावे…? कसे सांगावे?
राजा मी… तू माझी राणी, किंवा तुझ्याविना जीवन विफल वगैरे असे काही म्हणावे का…?
नाही… नाही… खूपचा मेलोड्रॅमॅटिक, फिल्मी वाटणार….
तू फार चांगली आहेस… असे म्हणावे…
नाही… ते फारच रुक्ष वाटेल…
मग काय सांगावे बरे????
सकाळी ऑफिसचे कारण सांगून वेळ मारून नेली खरी, पण आता संध्याकाळी काय सांगणार?
राहुलला बिचाऱ्याला काहीच सुचेना….
बायकोला आवडेल असे वागणे आणि बोलणे…
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवेत बाबा…
लाईन लागेल, लाईन नवऱ्यांची!
राहुलच्या मनात विविध विचारांची गर्दी झाली होती
संध्याकाळ झाली आणि घरी जायची वेळ झाली…
रोज संध्याकाळ होताच घरी जाण्यासाठी घाई करणाऱ्या राहुलचा पाय आज ऑफिसमधून घरी जायला निघत नव्हता
आपल्याला पाहताच मॅडमच्या प्रश्नांची सरबत्ती चालू होणार याची त्याला पूर्ण खात्री होती…
होमवर्क न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता…
जड पावलांनी राहुल घरी गेला आणि मोठ्या हिमतीने त्याने डोरबेल वाजवली…
त्याच्या मुलाने, म्हणजेच सोहमने दार उघडले आणि पुढच्याच क्षणी कांदाभजीचा
सुगंध नाकात शिरला…
सोहम म्हणाला, ” डॅडी, मम्माने आज कांदाभजी बनवली आहे… पटकन फ्रेश होऊन ये मी पण थांबलोय तुझ्यासाठी
राहुल गुपचूप मान डोलावून आत गेला… आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला
अनुने भज्यांची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली…
त्याने विलक्षण अपराधी चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले…
अनुने जोरात हसत विचारले, “काय रे? काही सुचले की नाही तुला…?”
राहुलने घाबरून नकारार्थी मान हलवली… त्याला प्रचंड अपराधी वाटत होते
तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदाने म्हणाली, “अरेच्चा! मलाही नाही सुचले…!”
राहुल तुफान गोंधळला…
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया…?
काय झालाय हिला?
मग अनु बोलायला लागली…
काही दिवसांपूर्वी मला एका मैत्रिणीने विचारले…
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटते…?
मी चिक्कार विचार केला…
पण मला काही सांगताच येईना…
मग मलाच भीती वाटायला लागली…
इतका साधा प्रश्न, पण त्याचे उत्तर मला देता का येत नाहीये ? माझे तुझ्यावरचे प्रेम कमी झाले की काय…?
विलक्षण अपराधी वाटायला लागले… काय करावे कळेना…
मला स्वतः विषयी शंका होती पण लग्नाच्या १२ वर्षानंतर ही
तुझे प्रेम कणभर ही कमी झालेले नाहीये याची पुरेपूर खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला…
मला वाटले… तुला येईल उत्तर देता आणि तुला उत्तर देता आले तर मी दोषी आहे
पण गम्मत म्हणजे … तुलाही उत्तर देता आले नाही…
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत…
जिथे एकमेकांना समजून घ्यायला शब्दांच्या कुबड्यांची आता गरज नाहीये…
एकमेकांबद्दल काय वाटते ते सांगायला आता शब्द सापडत नाहीत आणि आपल्याला त्याची गरजही वाटत नाही…
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपडच संपलेली आहे…
असे म्हणून अनुने एक कांदा भजी प्रेमाने त्याच्या तोंडात टाकली…
आईशपथ सांगतो…
त्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता…!
समाप्त