थप्पड!!! | Marathi Katha Kathan

थप्पड!!! | Marathi Katha Kathan

Free Woman Nature photo and picture

जेव्हापासून विनीत माझ्या आयुष्यातून निघून गेला, तेव्हापासून मला अगदी सगळ्या मुलांचाच तिरस्कार वाटू लागला आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. आम्ही ४ वर्षांपासून रिलेशन मध्ये होतो. पण जेव्हा तो एक दिवस मला न सांगता माझ्या आयुष्यातून निघून गेला तेव्हा मला समजले की या जगात प्रेम नावाची गोष्टच अस्तित्वात नाही.

आता मी एक हृदय नसलेली मुलगी झाले आहे. मला आता कशाचीच भीती  वाटत नाहीये, कारण मला वाटतंय की या पेक्षा जास्त वाईट असे काय घडेल माझ्या आयुष्यात? म्हणूनच आज आई वडिलांच्या सांगण्यावरून मी एका मुलाशी लग्न करायला तयार झाले आहे.

आईबाबांनी सांगितले कि त्या मुलाला त्या मुलाला मला भेटायचे आहे. यावर मी बोलले,”बाबा, त्या मुलाला भेटून असे काय त्याच्याबद्दल मी माहीत करून घेणार आहे? कारण इतकी वर्षे त्याच्यासोबत राहूनही मी विनीतला ओळखू शकलो नाही, मग एका छोट्या भेटीनंतर मी त्या अनोळखी व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखणार?”

बाबा ठामपणे म्हणाले,”तुला नसेल भेटायचे त्याला. पण त्या मुलाला तुला नक्कीच भेटायचे आहे.” मी नाईलाजाने त्या मुलाला भेटायला तयार झाले. आईबाबांची इच्छा होती की मी एकटेच त्याला भेटायला जावे. त्या मुलाला रात्रीच्या जेवणासाठी मेनलॅन्ड चायनाला भेटायचं ठरवलं. डिनर डेटच म्हणा नं! 

मी अक्षरशः झॉम्बी सारखी झाले होते. आता मला काहीही करायला उत्साह वाटत नव्हता. माझ्या हातात जे कपडे आले ते मी घातले आणि  मेनलॅन्ड चायनाला जाऊन पोहोचलो.

पाहिले तर तो माझीच वाट पाहत बसला होता. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि माझे नाव विचारले. मी नाव सांगताच तो मला कोपऱ्यातल्या टेबलावर घेऊन गेला.

रेस्टोरंटचा अँबियन्स खूप छान होता. मंद से रोमँटिक म्युसिक चालू होते. मी  जाऊन त्याच्या समोर बसले. त्याच्या डोळ्यात चमक आली होती. पण ही चमक मला माहीत आहे. प्रत्येक मुलगा पहिल्या भेटीत हे दाखवतो.

हे मराठी कथा कथन आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.

पण नंतर त्याचे प्रेम थंड पडत जाते. विनीत मला सोडून गेला पण मला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवून गेला. माझा पडलेला चेहरा पाहून त्याने मला विचारले,”काय झाले सोनाली? सर्व काही ठीक आहे ना? मी त्याला उत्तर दिले,”माझी तब्येत थोडी खराब आहे.” मग तो म्हणाला, “अरे! मग आज मला भेटायला का आलीस? आपण पुन्हा कधीतरी भेटलो असतो.”

त्याच्या डोळ्यात खरेपणा होता. तो एक डिसेन्ट मुलगा वाटत होता. पण मला त्याच्यावर विश्वास ठेवायचं नव्हता कारण मला माहित होते कि मुले सरड्याप्रमाणे किती लवकर रंग बदलतात ते!. मी त्याला म्हणाले,”नाही, आता मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये.” त्याने माझ्या आवडीच्या चायनीज डिशेस ऑर्डर केल्या.

जेवत असताना मला लक्षात आले कि मी अद्याप त्याचे नावाचं विचारले नाहीये. मी त्याला म्हणाले,”सॉरी, मी हा प्रश्न आता विचारतेय. पण तुझे नाव काय?” “विनीत.” त्याने जेवता जेवता उत्तर दिले. त्याचे नाव ऐकून माझे टाळकेच सरकले. हे तेच नाव होते जे मला पुन्हा कधी ऐकायचे नव्हते. मला माझाच राग आला.

मी ह्या मुलाला भेटायला तर तयार झाले पण मी त्याचे नाव विचारले नाही, ना वडिलांना, ना आईला, ना त्याला. मी ताडकन उभी राहिले आणि त्याला सांगितले की मी निघते आहे, माझी तब्येत अचानक बिघडली आहे.”  तो एकदम घाबरला,”काय झाले सोनाली? चल मी तुला माझ्या गाडीने तुझ्या घरी सोडतो.”

पण आता त्याच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द मला काट्यासारखा टोचत होता. त्याला काहीही उत्तर न देता मी तिथून निघून गेले. तो धावत माझ्या मागे आला. पण मी रागाने थरथरत होते. माझ्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते.

बाहेर येऊन मी टॅक्सीची वाट पाहू लागले. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून विनीतने माझा हात धरला आणि मला त्याच्या गाडीत बसायला सांगितले. त्याने माझा हात धरला, ही एकाच गोष्ट माझ्या संतापाचा कडेलोट होण्यास पुरेशी होती. संतापाच्या भरात मी त्याला जोराने साणकन कानाखाली मारली.

तो आश्चर्याने जणू स्तब्धच झाला होता आणि मग ‘त्या’ विनीतच राग ‘ह्या’ विनितावर निघाला आणि मी रागाने म्हणाले,”किती स्वार्थी आहात तुम्ही मुलं! फक्त तुम्ही स्वतःचा विचार करता. तू काय तुला वाटेल तेव्हा, वाटेल ते करशील का? तुला वाटेल तेव्हा कोणाचाही हात धरशील का? आणि मग ४-४ वर्ष रेलशन मध्ये राहून न सांगता पळून जाशील?”

विनीत अवाक होऊन माझ्याकडे बघत होता. आता आजूबाजूची लोक देखील आमच्याकडे बघायला लागली होती. तितक्यात टॅक्सी आली आणि मी बसले आणि तिथून निघाले. घरी येताच आईबाबांना काहीही सांगितले नाही. एकटीच माझ्या रूममध्ये मी तासभर रडत राहिले. सकाळी मी जरा लेटच उठले.

पण मी रात्री केलेल्या गोष्टीचा मला पश्चाताप होत नव्हता. मला असे वाटत होते कि मी त्याच विनीतला थप्पड मारली होती. काही वेळाने आईने मला हाक मारली. मी माझ्या रूमचे दार उघडले. आई म्हणाली,”विनीत त्याच्या आई बाबांसोबत आला आहे. लवकर तयार हो आणि खाली ये.”

मला माहीतच होते कि तो नक्कीच त्याच्या आईबाबांना घेऊन येईल आणि कालच्या प्रसंगाबद्दल सांगून तो माझ्याशी लग्न करू शकत नाही असे सांगेल. पण मी घाबरले नाही. मी खाली गेले. खाली, विनीत बसला होता, त्याने माझ्याकडे पाहिले, आई किचनमध्ये होती. मीही किचनमध्ये गेले.

आईच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने मला सांगितले की विनीत आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाला ‘हो’ म्हटले आहे आणि लवकरच लग्न करायचे आहे. मला समजलेच नाही की मी काल ज्या मुलाला थप्पड मारली, त्या मुलाला माझ्याशी लग्न का करायचे आहे? मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहिले.

पण त्याने फक्त माझ्याकडे पाहून स्माईल दिली. मी आईला सांगितलं की मला त्याच्याशी प्रायव्हेटली बोलायचं आहे. विनीत माझ्या रूममध्ये आला. त्याचा चेहरा एकदम इनोसंट दिसत होता. त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं की तो दिसायला काही वाईट नव्हता, खरं तर तो देखणाच होता. मी त्याला विचारलं,”तू काय डोक्यावर पडला आहे का?

काल आपल्यात इतका तमाशा झाला तरीही तू लग्नाला हो म्हटलंस? तुला माझ्या पास्ट बद्दल काही माहीत तरी आहे का?” “तुझ्या पास्ट बद्दल माहित पडले म्हणूनच मी लग्नाला हो म्हटलं.” विनीत म्हणाला. मला काही कळलेच नाही. मी काही विचारणार इतक्यात तोच बोलू लागला,”काल रात्री तू रागात एकदम आंधळी झाली होतीस.

तुझ्या कालच्या एकंदरीत वागणुकीवरूनच मला कळलं की तू वड्याचं तेल वांग्यावर काढत आहेस. कुणा दुसऱ्याचा राग तू माझ्यावर काढत आहेस. मी रात्री घरी जाऊन आपल्या कॉमन फ्रेंड्सकडून तुझी माहिती काढली. आणि मला हेही समजले की त्या मुलाचे नाव पण विनीत होते. नक्की त्याचाच राग काल तू माझ्यावर काढलास.

तू तशी एक खंबीर आणि प्रेमळ मुलगी आहेस आणि आईबाबांवरील तुझ्या प्रेमामुळे मला भेटायला तयार झालीस.  म्हणूनच काल रात्री मी तुझ्या प्रेमात पडलो. मी तुला एक रिक्वेस्ट करतो की तू मला एक संधी दे हे सिद्ध करण्यासाठी सर्वच मुलं सारखी नसतात.” विनीतचे हे  बोलणे ऐकून मी त्याला नाही म्हणूच शकले नाही. मी लग्नाला होकार दिला.

विनीतच्या माझ्यावरील विश्वासामुळे माझ्यातले प्रेम पुन्हा जागे झाले आणि माझ्या आता लक्षात आहे की प्रेम अजूनही अस्तित्वात आहे.

समाप्त

Leave a Reply