रिवा आणि रितेशच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. पण सकाळीच दोघांमध्ये कोणत्यातरी शुल्लक मुद्द्यावरून जोरदार वाद झाला आणि त्यातूनच दोघेही एकमेकांवर रागावले होते.
दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. या दहा वर्षात त्यांचे प्रेम फिके पडू लागले होते. प्रेमाची जागा आता तक्रारींनी घेतली होती. दोघांनाही हे चांगलेच कळत होते आणि त्यांचे नाते पुन्हा पूर्वीच्या स्थितीत यावे अशी त्यांची इच्छा होती. पण सर्वोतोपरी प्रयत्न करूनही त्यांच्या नात्यात दुरावा काही कमी होत नव्हता.
रितेश बाल्कनीत उभा राहून स्वतःच्याच विचारात मग्न असतानाच रिवा त्याच्याकडे आली. त्याच्या हातात तिने एक डायरी दिली आणि म्हणाली, “मी या रोजच्या भांडणांना कंटाळले आहे. आपल्या दोघांमध्ये नक्कीच काहीतर उणिवा आहेत, ज्या आपल्याला आपल्यापासून दूर कराव्या लागतील. तरच आपले नाते पुढे जाऊ शकेल. पुढच्या एका वर्षात माझ्यात ज्या काही उणिवा दिसतील, त्या तुम्ही या डायरीत लिहाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी माझ्यासाठीही अशीच एक डायरी घेतली आहे, ज्यामध्ये मी तुमच्या कमतरता लिहीन. पुढच्या वर्षी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही एकमेकांच्या डायरी वाचूयात आणि त्यात जे काही काही लिहिले असेल त्यावर चर्चा करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करूयात.”
ही Marathi Hrudaysparshi Katha आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
नवऱ्याने होकार दिला. दोघेही आता रोजच्या रोज डायरी लिहू लागले. बघता बघता एक वर्ष उलटले. लग्नाचा वाढदिवस आला. दोघेही समोरासमोर बसले होते. प्रथम रिवाने तिची डायरी रितेशकडे दिली.
रितेश cची पाने उलटू लागला.
पहिले पान: मागच्या वर्षी माझ्या वाढदिवशी तू मला एकही गिफ्ट दिले नाहीस. मला खूप वाईट वाटलं. तू भेट द्यायला हवी होती.
दुसरे पान: जेव्हा माझे आई आणि बाबा आमच्या घरी आले, तेव्हा आम्ही चित्रपट पाहण्याचा बेत केला होता, पण तुम्ही त्या दिवशी ऑफिसमधून उशिरा परत आलात. मला माझ्या आई बाबांसमोर कानकोंडे व्हावे लागले. वचने पाळायला शिकले पाहिजे.
तिसरे पान: मी खूप मेहनत करून तुझ्यासाठी स्वेटर विणला, पण तू कौतुकाचे दोन शब्दही बोलला नाहीस. मी पण या लायकीची नाही का?
अशीच बऱ्याच तक्रारींनी डायरीची सगळी पाने भरली होती.
रितेशने डायरी वाचल्यानंतर रिवा म्हणाली, “मला वाटतं आता या चुका तू पुन्हा करणार नाहीस.”
त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. मग रिवाने रितेशची डायरी घेतली आणि पानं उलटायला सुरुवात केली.
पहिले पान कोरे होते.
दुसरे पानही कोरे होते.
तिसरे पानही कोरे होते.
रिवाच्या लक्षात आले की डायरीची सर्वच्या सर्व पाने कोरी आहेत. ती रागाने म्हणाली, “तू माझा एक शब्दही मान्य करू शकत नाहीस का?. मी वर्षभर खूप मेहनत करून संपूर्ण डायरी लिहिली आणि तुला एक पानही लिहिता आले नाही.”
रितेश शांतपणे म्हणाला, “शेवटचं पान उघड. त्यावर मी सर्व काही लिहिले आहे.”
रिवाने शेवटचं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते:
“माझी प्रिय रिवा! मी कितीही तक्रार केली, तुझ्याशी कितीही वाद घातला तरी सत्य हेच आहे की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी मनापासून तुझा ऋणी आहे. कारण गेल्या काही वर्षांत तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे तुझ्याविरुद्ध या डायरीत लिहिण्यासारखे काही नाही. तुमच्यात काही कमतरता नाही असे नाही, पण त्या सर्व उणिवा तुमच्या प्रेम, समर्पण आणि त्याग यांच्यापुढे फारच छोट्या आहेत. माझ्यातही हजारो उणिवा आहेत, तरीही तू कायम माझ्या सोबत माझी सावली आहेस. स्वतःच्या सावलीचाही दोष कोणी शोधतो का? तू काहीही आणि कशीही असलीस आणि माझ्याशी कितीही भांडलीस,तरीही माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यावर असेच प्रेम करण्यात घालवायचे आहे. तुदेखील माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असेच प्रेम करत राहशील अशी मला खात्री आहे.”
हे सारं वाचून रिवाच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रू वाहू लागले. ती ओक्सबोक्शी रडू लागली. “रितेश मला माफ कर. मी फक्त तुझ्यातल्या उणिवा, चुका शोधात राहिले, पण तू? तू माझ्यावर फक्त आणि फक्त प्रेम करत राहिलास. तुझे अबोल प्रेम मी कधी ओळखलेच नाही रे. शक्य असेल तर मला माफ करशील ना?” रितेश म्हणाला,”अगं ए वेडाबाई, असे कुणी रडत का?” मग त्याने रीवाला आपल्या कुशीत घेतले. तिने रितेशकडून तिची डायरी हिसकावून घेतली आणि गॅसस्टोव्हवर जाळून टाकली. डायरीसोबत त्या सगळ्या तक्रारी, ज्या त्याच्या मनात इतकी वर्ष दडपल्या होत्या त्यादेखील जळून गेल्या.
आता रिवा आणि रितेशने एकमेकांना जसे आहे तसे स्वीकारायचे ठरवले आहे – त्यांच्यात असलेल्या गुणदोषांसकट, फक्त आणि फक्त प्रेमाने!!!!