वयाच्या ३५-४० वर्षांपर्यंत स्त्रियांना त्यांच्या शरीराची आणि आरोग्याची फारशी काळजी नसते. त्या त्यांच्या स्लिम फिट लुकवर अधिक लक्ष केंद्रित करतात. पण वयाची वयाच्या चाळीशी नंतर स्त्रियांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हळूहळू तब्येत कमकुवत होत राहते. त्यातही त्या सतत स्वतःकडे दूर करीत राहिल्या तर त्यांना पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिस, अशक्तपणा, पक्षाघात, हृदयरोग, मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.
हे सर्व रोग हळूहळू शरीराला अशक्त आणि निर्जीव बनवतात. हे टाळण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा. म्हणजे चाळीशी नंतर उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देणे सोपे होईल.
पुरेशी झोप
जसजसे आपण वयाच्या चाळीसाव्या वर्षी पोहोचतो तसतसे घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. त्यामुळे बहुतांशी स्त्रिया अपुऱ्या झोपेची शिकार बनतात. त्यामुळे झोपेचा त्रास होऊ लागतो. त्याचा परिणाम म्हणजे कॉर्टिसोल हार्मोन्समध्ये वाढ आणि तणाव वाढणे. अशा परिस्थितीत, रोजच्या रोज पुरेशी झोप घेणे आणि मेडिटेशन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
संतुलित आहार
वयानुसार तुमची त्वचा, केस, चेहरा बदलतो. हा बदल शरीरातही चालू असतो. त्यामुळे चाळीशीनंतर आहार संतुलित असणे अत्यंत गरजेचे असते. रोजच्या आहारात कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, फळभाज्या, सुकामेवा तसेच सीझनल फळे खावीत. त्याचप्रमाणे दुधाच्या पदार्थांचादेखील आहारात आवर्जून समावेश करावा. त्यामुळे शरीराला संतुलित प्रमाणात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने, कर्बोदके इ. मिळेल आणि शरीराचा कमकुवतपणा दूर होईल.
व्यायाम आणि योगासने
जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही नेहमीच जंक फूड खात असाल तर शरीरात कॅल्शियमसह इतर आवश्यक खनिजांची कमतरता भासते. वयानुसार, शरीरातील चयापचय कमकुवत होऊ लागते. या कारणास्तव, चाळीशीनंतर बहुतेक महिलांमध्ये पोटाची चरबी वाढू लागते. त्याच वेळी, प्री-मेनोपॉजच्या प्रभावामुळे, शरीरातील हाडांची घनता कमी होते आणि सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. परंतु संतुलित आहार आणि योग्य त्या व्यायामाच्या मदतीने चयापचय वाढवता येते. ज्यामुळे पोटाची चरबी वाढण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर शरीराला शक्य होईल, झेपेल तितका व्यायाम करावा.
व्यायामासोबत योगासनेही करावीत. त्याने शरीराची लवचिकता वाढून सांध्यांना आराम मिळतो.
डॉक्टरी सल्ला
स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर प्री-मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे पाळीत अनियमितता, शरीरात अचानक उष्णता वाढणे (हॉट फ्लॅशेस), योनीमार्गाचा कोरडेपणा, सेक्समध्ये अरुची, चिडचिड आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत, रजोनिवृत्तीपूर्वी उद्भवणारी ही लक्षणे आधीच जाणून घेणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे. त्यावरच्या उपायासाठी डॉक्टरी सल्ला आवर्जून घ्या.
चाळीशीचा उंबरठा गाठल्यावर स्त्रियांनी केवळ सुंदर दिसण्यावर आणि फिगरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपले आरोग्य आधीच जपा. जेणेकरून वयाच्या चाळीशी नंतरही तुम्ही राहाल निरोगी!!