साजूक तूप कुणाला नाही आवडत? साजूक तूप खाण्याचे फायदे देखील फार आहेत. अनेक भारतीय पदार्थ बनवताना या तुपाचा आवर्जून वापर केला जातो. पण त्यात आपले उन उन खिचडी साजूक तूप म्हणजे अहाहा…
पण दुधाची मलई गोळा करणे आणि घरी साजूक तूप तयार करणे हे काम हे काम जर तुम्हाला किचकट वाटत असेल, तर आता मलईमधून तूप काढण्यासाठी पुढील काही सोप्या टिप्स जाणून घ्या. त्यामुळे काही मिनिटांतच तुम्ही विनाझंझट चवदार साजूक तूप बनवू शकाल.
1. साजूक तूप बनवण्यासाठी प्रथम फुल फॅट दूध (म्हशीचे किंवा गायीचे) घ्या आणि नंतर दूध गरम करून रात्रभर थंड होऊ द्या. दुसऱ्या दिवशी दुधात त्यावर घट्ट अशी मलई (साय) येईल. ती मलई एका भांड्यात काढा. ही भांड्यात साठवलेली मलई पूर्ण वेळ फ्रीजमध्येच ठेवा. २-३ आठवड्यानंतर आता तुमच्याकडे तूप तयार करण्यासाठी पुरेशी मलई असेल.
2. तूप बनवण्यासाठी फ्रीजमध्ये साठवलेली मलाई फ्रीजबाहेर काढून ती सर्वसामान्य तापमानाला येउ द्या.
3. आता साठवलेली मलई एका भांड्यात ठेवा आणि त्यात थंड पाणी टाका आणि रवीने किंवा ब्लेंडरच्या मदतीने मलई चांगलीच ब्लेंड करा. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा बाहेरील तापमान जास्त असल्यास, आपण मलईमध्ये थंड पाण्यासह ७-८ बर्फाचे तुकडे घालू शकता. त्यामुळे मलईमधून लोणी लवकर वेगळे होते. १०-१५ मिनिटे ब्लेंड केल्यानंतर, पांढरेशुभ्र लोणी मलईपासून वेगळे होईल.
4. आता हे लोणी तीन ते चार वेळा पाण्यात धुवून घ्या, जेणेकरून त्याला वास येणार नाही आणि त्याचा आम्बटपणाही निघून जाईल. लोणी काढून झाल्यावर जे ताक उरेल त्याचा उपयोग तुम्ही कढी, उकड, मठ्ठा करण्यासाठी करू शकता.
5. आता एक जाड बुडाचे पातेले घ्या आणि त्यात लोणी टाकून ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. लोणी कमीतकमी २०-२५ मिनिटे तरी कढले गेले पाहिजे. दरम्यान लोणी अधून मधून मोठ्या चमच्याने ढवळत राहा. मध्येच कडा खरवडत राहा. लोणी पूर्णपणे कढल्यावर तूप तयार होईल.
6. मग गॅस बंद करा आणि गाळणीच्या मदतीने मिश्रण एका भांड्यात गाळून घ्या. तुमचे शुद्ध आणि पौष्टिक साजूक तूप (देशी तूप) तयार आहे. ते थंड करून हवाबंद डब्यात ठेवा.
अशाप्रकारे आम्ही सुचविलेल्या पद्धतीचा वापर करून साजूक तूप तयार करणे सोपे तर होईलच, पण घरी बनवलेल्या तुपाच्या शुद्धतेची 100% हमीही असेल.